नवी दिल्ली : भारताने ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ( Hypersonic Missile ) यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे असे तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे तंत्रज्ञान अमेरिकेकडेदेखील नाही. रशिया, चीननंतर भारताने या प्रकारच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीची माहिती ट्विट करून दिली आहे. ही चाचणी ओडिशा येथील किनार्यावर घेण्यात आली.
“या क्षेपणास्त्राची चाचणी हा ऐतिहासिक क्षण आहे,” असे सांगून सिंह म्हणाले की, “यामुळे भारताला अशा प्रकारचे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने एक मोठा टप्पा गाठला आहे. हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे आपला देश अशा महत्त्वाच्या आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे,” असे ते म्हणाले. या यशाबद्दल सिंह यांनी ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटना’ (डीआरडीओ), सशस्त्र दल आणि उद्योगजगताचे अभिनंदन केले आहे.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते १ हजार, ५०० किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत पे लोड वाहून नेऊ शकेल. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे ताशी सुमारे ६ हजार, १७४ किमी वेगाने मारा करते. अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या एअर डिफेन्स यंत्रणेला या क्षेपणास्त्राचा शोध घेऊन त्याला हवेत नष्ट करणे अशक्य होते. हे क्षेपणास्त्र आधुनिक लष्करी तंत्रज्ञान, प्रतिकार शक्ती आणि मारक शक्तीने सुसज्ज करण्यात आले आहे.