त्यांनी जपलं माणूसपण..

    18-Nov-2024
Total Views |
Umakant Chaudhari

पैशापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे असल्याचे बाळकडू उमाकांत श्रीकृष्ण चौधरी यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते. जीवनात अनेक चढउतार आले असतानाही त्यांनी पैशापेक्षा माणुसकी जपत संकटांना तोंड दिले. अशा परिस्थितीत ही त्यांनी चेहर्‍यावरील हसू कधी ढळू दिले नाही. त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...

उमाकांत यांचे शालेय शिक्षण कल्याणमधील गणेश विद्यामंदिर येथून झाले. त्यांनी बिर्ला महाविद्यालयातून बी.ए पर्यंतचे, शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उल्हासनगरच्या आर.के.टी महाविद्यालयातून एम.ए केले. पंत वालावलकर अध्यापक महाविद्यालय, देवगड येथे, बी.एड केले. एमएसडब्ल्यूचे शिक्षण ही त्यांनी घेतले आहे. कल्याणमधील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. जीवनात संघर्ष असला, तरी त्यांचे शिक्षण आनंददायी झाले. वडील भांडुपच्या एका कंपनीत कामाला होते. परंतु, १९९० साली कंपनी बंद पडली. जवळजवळ सहा वर्षे कंपनी बंद होती. पण, त्याचा परिणाम कुटुंबावर कधीही झाला नाही. वडिलांचे सामाज संपर्क चांगला होता. त्यामुळे ते नेहमीच इतरांना मदत करत असत. वडिलांचा मित्रपरिवार हा सुशिक्षित आणि आर्थिक परिस्थिती चांगली असलेला होता. पण, वडिलांनी कधीही त्यांच्याकडे हात पसरले नाही. कंपनी बंद असली तरी दिवाळीला सर्वात जास्त फटाके माझ्याकडे असायचे असे उमाकांत सांगतात. कंपनी बंद झाल्यावर घरचे भाडेही ही घरमालकांनी कधी मागितले नाही. कंपनी चालू झाल्यावर भाडे द्या असे त्यांनी सांगितले होते. गवळ्यांची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. तेदेखील नियमित दूध देत असत. मात्र, पैसे नंतर द्या असे सांगत होते. त्यामुळे लहानपणापासूनच ‘माणूस महत्त्वाचा’ या संस्कारात आम्ही वाढलो असे उमाकांत सांगतात.

लहान बहीण, आई आणि वडील असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. उमाकांत यांची आई संजीवनी या गृहिणी आहेत. उमाकांत नववीला असताना, प्रत्येक शाळेत सूर्यनमस्कारांचा उपक्रम सुरू केला होता. त्यावेळी साळुंखे सरांनी सूर्यनमस्कारांची जबाबदारी उमाकांत यांच्यावर टाकली. आंतरशालेय स्पर्धेत नृत्य, गायन, कोरस यात ते सहभागी होत असत. कबड्डी, खो-खो, क्रिकेट हे त्यांच्या आवडीचे खेळ होते. त्यामुळे खेळ खेळण्याकडे त्यांचा कल होता. आपण कोणाला मदत केली, तर आपल्याला ही भरभरून मदत मिळते, हा अनुभव मला आता येत असल्याचे उमाकांत सांगतात. येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

उमाकांत यांनी २००६ ते २०१० सालापर्यंत तिसाई इंग्लिश स्कूल कल्याण आणि बदलापूर येथील प्रगती विद्यालय येथे इतिहास, मराठी आणि माहिती-तंत्रज्ञान या विषयाचे शिक्षक म्हणून काम केले आहे. नवीन शैक्षणिक प्रयोग आणि संशोधनाची गरज लक्षात घेऊन, दि. १९ नोव्हेंबर २०१० साली ‘स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेतर्फे कल्याणमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम सुरु केले. विद्यार्थ्यांनी खेळायला शिकले पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व समजून घेऊन, त्यावर संशोधन करून अभ्यास करावा, यासाठी ‘लक्ष्यभेद विद्यार्थी मार्गदर्शन’ कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी कार्यशाळा, सेमिनार, आणि व्याख्याने आयोजित केली जातात. सध्या संस्था कौशल्य विकासावर अधिक भर देत आहे. यामध्ये महिला प्रशिक्षण, विधवा महिला प्रशिक्षण, तृतीयपथीयांना प्रशिक्षण, १8 वर्षावरील ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार कसा उपलब्ध होईल, हे पाहिले जाते. २०२४ सालापर्यंत 35० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विधवा महिलांसाठी ‘रोटरी क्लब ठाणे’ कडून प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकार्‍यांकडून तीन टक्के निधीतून प्रशिक्षण दिलेल्या महिलांना, शिलाई मशीन दिल्या जातात. त्या महिला आता स्वत:च्या पायावर उभे राहिल्या आहेत. समाजात अनेक समस्या असतात.,त्या सोडविण्यासाठी संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्या समस्येवर काम करणारी सामाजिक संस्थादेखील समाजात असणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्था नोंदणीकृत करण्यासाठी, संस्थांना मार्गदर्शन ‘स्टडी वेव्हज’च्या माध्यमातून केले जाते. तसेच या ‘स्टडी वेव्हज’कडे बेघर मुलांसाठी, वनवासी मुलांसाठी, महिलांसाठी काम करणार्‍या वेगवेगळ्या संस्था आहे. याशिवाय घनकचर्‍यावर काम करणारी एक संस्था आहे. अशाप्रकारे विविध समस्येवर काम करणारी संस्थांची एक टीम ‘स्टडी वेव्हज’कडे उपलब्ध आहे. या सर्व संस्थेच्या माध्यमातून समाजात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. संस्था नोंदणी करणे, ऑडिट करणे यासाठी संस्थांना प्रशिक्षित केले जाते. संस्थांनी काम केल्यावर त्यांना निधी मिळतो. सीएसआरसाठी प्रयत्न करत असतो. संस्थेतील प्रत्येक जण स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून हे काम करत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून संस्था या पद्धतीने काम करत आहे. ‘भारतीय शिक्षण मंडळा’तर्फे गेल्या तीन वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरण समाजाच्या हितासाठी कसे आहे, त्यांचे ही प्रशिक्षण घेत आहे. उमाकांत यांना आजतागायत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्त्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

जान्हवी मोर्ये