ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मंच कोसळला

    17-Nov-2024
Total Views |
Uddhav Thackeray

ठाणे : बाह्या सरसावून महायुतीला आव्हान देणार्‍या उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या सभेचा मंच शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी रात्री कोसळला. यामुळे काही क्षण सगळेच हादरले. मंचावर भाषण संपवून उभे असलेल्या उद्धव ठाकरे यांना शरीररक्षक आणि सहकार्‍यांनी दोन्ही हाताला धरून व्यासपीठावरून उतरवले.

सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी आव्हानवीरांची चांगलीच तंतरल्याची चर्चा रंगली होती. मविआतील उबाठा शिवसेनेचे ठाणे शहर विधान सभेतील उमेदवार राजन विचारे आणि अन्य उमेदवारांसाठी शनिवारी रात्री ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेला मंचावर सर्व उमेदवारांसह माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

सभेला संबोधित करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाह्या सरसावत महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ९ वाजून ५७ मिनिटांनी सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे मंचावर असतांनाच अचानक मधोमध मंच कोसळला. यावेळी ठाकरे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. त्याचवेळी मंचावर गर्दी जमली आणि त्यामुळे मंच कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी उबाठाच्या या कोसळलेल्या सभेची चर्चा रंगली आहे.