परिक्रमेतून सुरू होणारा आत्मशोधाचा प्रवास’

    16-Nov-2024
Total Views |
narmadeche har book review


नदी ही प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात भेटते. काहींसाठी ती फक्त पाण्याचा प्रवाह असते, तर काहींसाठी ती जगण्याचा प्रवाह होते. ज्यांच्यासाठी ती जगण्याचा प्रवाह होते, त्यांच्या हृदयातून ती वाहू लागते. सुधीर राठोड हे अशाच नदी हृदयात घेऊन जगणार्‍या माणसांपैकी एक. सुधीर राठोड यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंग परदेशी आणि इतर सहकार्‍यांसोबत केलेल्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव त्यांच्या ‘नर्मदे हर-आत्मशोधाची आनंदयात्रा’ या पुस्तकात मांडला आहे. ‘मीडिया वॉच’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात सुधीर यांचे अनुभव सागर वानखडे यांनी अत्यंत समर्पक अशा शब्दांत शब्दबद्ध केले आहेत.

प्रवासाची खरी सुरुवात ही प्रवासाची तयारी करण्यापासून नाही, तर ‘आपल्याला प्रवास करायचा आहे’ या विचारापासून होते. सुधीर राठोड यांच्या नर्मदा परिक्रमा प्रवासाची सुरुवात सुद्धा अशीच झाली. 2019 साली जरी त्यांनी ही परिक्रमा सुरू केली असली, तरीही या परिक्रमेचा विचार त्यांनी आणि प्रवीणसिंग परदेशी यांनी 2011 सालीच केला होता. नर्मदा परिक्रमा करण्याआधी सुधीर राठोड यांनी अनेक नद्यांना भेट दिली होती. या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलेले मनोगत नद्यांविषयी त्यांना वाटणारी ओढ व्यक्त करते आणि त्यांची नर्मदा परिक्रमा कशी झाली, हे वाचण्याची आपली उत्कंठादेखील वाढवते.

प्रवीणसिंग परदेशी यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला मांडलेले ‘परिक्रमावासीचे मनोगत’ हे आजवर नर्मदाच काय तर जगभरातील कुठल्याही नदीची परिक्रमा केलेल्या किंवा करण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तीच्या मनातील भाव सांगायला पुरेसे आहे. परिक्रमेचा दिवस ठरवण्यापासून ते परिक्रमेवरुन परतण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे. पुस्तकात फक्त शब्द पेरूनच नव्हे, तर त्या शब्दांमागच्या भावनाही त्यात रुजवाव्या लागतात. सागर वानखेडे यांनी ते काम अतिशय उत्तमरीत्या केले आहे. त्यामुळेच अनुभव घेणार्‍याच्या भावना आणि लिहिणार्‍याचे शब्द, या पुस्तकात नदी सागराशी एकरूप होते, तसे एकरूप झाले आहेत.

हे पुस्तक एकूण 17 प्रकरणांमध्ये विभागले आहे. प्रत्येक प्रकरण आधीच्या प्रकरणाहून अधिक सुखद अनुभव देणारेच ठरावे. ‘परिक्रमेचा पहिला दिवस’ या प्रकरणात अनेक अडचणी येऊन सुद्धा परिक्रमेचा विचार जराही डगमगू न देणार्‍या या माणसांचे त्यांच्या नर्मदामाईवरील नितळ प्रेम आणि परिक्रमा करण्याची इच्छा किती प्रबळ होती, हे दिसून येते. ‘किसनगिरी व रुपनाथ महाराज’ या प्रकरणात सगळे काही गमावूनसुद्धा केवळ नर्मदामाईवर विश्वास ठेवून जगणार्‍या अनेक नर्मदाभक्तांचे प्रतिनिधित्व करणारे रुपनाथ महाराजांचे ‘मेरे हिस्से में मा आई’ हे वाक्य काळजाचा ठाव घेते. ‘पत्थरकुचा आदिवासी खेड्यातील रात्र’ आणि ‘बाजरीसिंगांच्या झोपडीतील श्रीमंती’ यांसारख्या प्रकरणांमधून स्वत: वाहून इतरांना समृद्ध करण्याची नदीची प्रवृत्ती तिच्या आसपास राहणार्‍या माणसांमध्येही निर्माण झालेली होते, याची अगदी खोलवर जाणीव करून देते.

सुधीर यांच्यासोबत आपण या पुस्तकातून नर्मदा नदीची शाब्दिक परिक्रमा करत असताना, ‘सूरजकुंडाची अस्वस्थ करणारी दुर्दशा’ हे प्रकरण आपल्या काळजाला चटका लावून जाते. सुधीर राठोड जरी त्यांच्या सहकार्‍यांसोबत त्यांची काही दिवसांची परिक्रमा करून परतले असले, तरी त्यांची परिक्रमा तिथे थांबलेली नाही आणि या पुस्तकाचा शेवटही त्यांनी तिथे केलेला नाही. त्यामुळेच या पुस्तकाच्या ‘नर्मदामैय्याची मंत्रमुग्ध करणारी रुपे’ या शेवटच्या प्रकरणात परिक्रमेहून परतल्यानंतरही नर्मदामैय्या त्यांच्या आठवणीत आणि मनात कायम कशी वाहत आहे, याचे भावस्पर्शी वर्णन केलेले आहे.

नर्मदेची विविध रूपे अनुभवत असताना, परिक्रमा करणार्‍याला स्वत:च्याही विविध रुपांची ओळख होत राहते आणि त्यातून ‘आत्मशोधाची परिक्रमा’ सुरू होते. त्यादृष्टीने ही परिक्रमा किती महत्त्वाची आहे, हे या पुस्तकातून सांगितलेले आहे. या पुस्तकात नर्मदा नदीच्या विविध रुपांसोबतच तिच्या सभोवतालचा भौगोलिक परिसर, तिच्या आजूबाजूला वसलेली मानवी वस्ती, त्यांचे राहणीमान, समाजजीवन, तिथला निसर्ग या सगळ्याची जिवंत वर्णने वाचकांच्या मनातही नर्मदा परिक्रमेविषयीची उत्सुकता प्रवाहित करणारी ठरावी.

नर्मदामाईचे नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित होते. या पुस्तकातील अनेक प्रकरणांमध्ये अनेक महान कवींच्या कवितांच्या काही ओळी आलेल्या आहेत, त्या ओळी पुस्तकातला अनुभव आपल्यापर्यंत अधिक परिणामकारकतेने पोहोचवतात. पुस्तकातील आलेली छायाचित्रे सुद्धा डोळ्यांना एक सुखद अनुभव देतात. पुस्तकात वर्णन केलेली प्रत्येक लहानसहान गोष्ट सुद्धा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत रूपात उभी राहते आणि सुधीर राठोड यांच्यासोबत आपलाही या पुस्तकातून शाब्दिक का होईना, नर्मदा प्रवास घडतो हे या पुस्तकाचे यश म्हणावे लागेल. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावे आणि नर्मदा परिक्रमेचा हा शब्दबद्ध अनुभव एकदातरी घ्यावाच असे हे पुस्तक आहे. नर्मदे हर!

पुस्तकाचे नाव : नर्मदे हर- आत्मशोधाची आनंदयात्रा
लेखक : सुधीर राठोड
शब्दांकन : सागर वानखडे
प्रकाशक : मीडिया वॉच
पृष्ठसंख्या : 112
मूल्य : 200 रुपये


दिपाली कानसे