ठाणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसने ( Congress ) यापूर्वी जेवढी आश्वासने दिली त्यापैकी एकाचीही पुर्तता केलेली नाही. जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे प्रलोभन दाखवुन काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेशात सत्ता हस्तगत केली, परंतु अद्यापही जुनी पेन्शन लागु करू शकलेली नाही. अशी टीका करून केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काँग्रेस आणि महाविनाश आघाडीची पोलखोल केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शनिवारी ठाण्यातील भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे, विलास साठे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री शेखावत यांनी, भारतीय जनता पार्टीने स्थापनेपासुन ज्या ज्या घोषणा केल्या त्यांना मूर्त स्वरूप दिले आहे, तर काँग्रेस केवळ सवंग घोषणा करते. किंबहुना, भाजप - एनडीए महायुती सरकारने प्रत्यक्षात राबवलेल्या अनेक योजना काँग्रेस पुन्हा नविन लिफाफ्यात घालुन कॉपी करते. काँग्रेसने यापूर्वी राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटकमध्येही खोटी आश्वासने देऊन त्यांची पुर्तता केलेली नाही.
महाराष्ट्रात मागील पाच वर्षातील मविआ आघाडीची अडिच वर्षे ही अमावस्येची होती. काँग्रेस आणि त्यांच्यासोबतची आघाडी सत्तेसाठी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर समाजासमाजात फुट पाडतात. जेव्हा जेव्हा आपण विभागले गेलो तो भाग भारतापासुन वेगळा झाला. तेव्हा, भारत अखंड ठेवण्यासाठी आपण एक असणे गरजेचे आहे. असे स्पष्ट करीत मंत्री शेखावत यांनी, एक है तो सेफ है या घोषवाक्याचे समर्थन केले. दरम्यान, भारताच्या विकास यात्रेत महाराष्ट्राने ग्रोथ इंजिन बनावे, यासाठी येणाऱ्या काळात देखील डबल इंजिनचे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात यायला हवे. किंबहुना ठाणे शहराच्या प्रगतीसाठी जनतेने तिसऱ्यांदा आमदार संजय केळकर यांनाच बहुमताने निवडून द्यावे. अशी अपेक्षाही मंत्री शेखावत यांनी व्यक्त केली.
मविआकडुन मातृशक्तीचा अपमान !
महायुती सरकारने लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेतर्गत महिलांना मिळत असलेल्या १५०० रुपयांना मविआ आघाडी लाच दिल्याचे म्हणत आहे. हा एकप्रकारे मातृशक्तीचा अपमान असल्याचे मंत्री शेखावत यांनी सांगितले. तेव्हा, लाडकी बहिण योजनेसह सर्व लोककल्याणकारी योजना यापुढेही निरंतर सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा जनता भाजप महायुतीलाच कौल देईल. असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला.