देशात सनातन धर्माशिवाय दुसरे काहीही नाही : योगी आदित्यनाथ

    15-Nov-2024
Total Views |
Yogi Adityanath

भाईंदर : “महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. महाराष्ट्रात अशा थोर पुरुषांची परंपरा आहे.देशात सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही. तेव्हा, ‘बटेंगे तो कटेंगे’ असा पुनरुच्चार करून कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका,” असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी केले.

मीरा रोड येथील सलासार मैदानात मिरा-भाईंदर आणि ओवळा माजिवडा या मतदारसंघाच्या अनुक्रमे नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या सभेत योगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “जातीच्या नावावर विभाजन करणार्‍या काँग्रेसने १९४७ सालापासून देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे. ‘कटेंगे तो बटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. १९४७ सालापासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली. मात्र, काँग्रेसने देशासोबत धोका केला. अखंड भारताचे तुकडे केले. तेव्हा मतांचे विभाजन होऊ देऊ नका. आपली लढाई महाविकास नव्हे, तर ‘महाअडाणी’ आघाडीविरोधात आहे. ते ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपल्या सणांच्या गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका,” असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता भारताच्या सीमा सुरक्षित आहेत. गेल्या ५० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही. तसेच महायुतीच्या ‘डबल इंजिन’शिवाय आता कोणताच पर्याय नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.