हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' ठरला 'इफ्फी'चा मानकरी

    15-Nov-2024
Total Views |
 
sholay
 
 
मुंबई : गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
 
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला 'शोले' चित्रपट आता सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' अनोख्या पद्धतीने सलाम करण्यासाठी सज्ज आहे. त्यात आता भारतीय चित्रपटजगतात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इफ्फीमध्ये चित्रपटाला गाला प्रीमियरचा मान मिळणं ही कौतुकाची गोष्ट ठरली आहे.
 
राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, समीर धर्माधिकारी, आनंद इंगळे, श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.