८३ वर्षांचे तरुण वर्तक काका

    15-Nov-2024
Total Views |

Vartak Uncle
 
समाजासाठी काम करत राहिले की, ईश्वर आपल्याला नक्की दीर्घायुषी करतो. असेच श्रीराम मंदिर संघर्षात आपले योगदान देणार्‍या नाशिकमधील कारसेवक अरविंद वर्तक यांच्याविषयी...
 
कोणतेही साधन नसताना, संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारींचे लोखंडी अँगल हलवून काढत, त्याच्या साहाय्याने अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाँचा आम्ही पाडला. त्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कुदळ किंवा फावडे नव्हते. प्रभू श्रीराम यांचे मंदिर उभारण्यासाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लोकांमध्ये एक प्रकारची शक्ती संचारली होती. बाबरी ढाँचाकडे जाणारे सर्व रस्ते उत्तरप्रदेश सरकारने बंद केले होते. तरीही प्रभू श्रीराम यांचे मंदिर उभारले गेलेच पाहिजे. या महत्त्वाकांक्षेने आम्ही १५० किमी पायी चालत अयोध्येला गेलो. साडेतीन दिवस पायी चालत असताना लोकांचे खूप प्रेम मिळाले. वाटेत लोकांनी आम्हाला जेवण दिले. पोलिसांना चकवा देत पुढे जाता यावे, यासाठी स्थानिकांनी मार्ग दाखवण्याचे काम केले. वाटेत खाण्यासाठी काही भेटले नाही, तर सातूचे पीठ सोबत घेऊन गेलो होतो. अयोध्येत जाण्यासाठी आम्हाला साडेतीन दिवस लागले. यावेळी एकही दिवस आम्ही उपाशी राहिलो नाही. चांगल्या कामासाठी स्थानिक लोकांनी खूप मदत केली. जेव्हा आम्ही अयोध्येत पोहोचलो तेव्हा, तीन ट्रक भरतील इतकी प्रेतं रस्त्यावर पडली होती. ती प्रेतं शरयु नदीच्या पाण्यावर तरंगू नये यासाठी त्यांना वाळूच्या पोत्यांना बांधून सोडल्याचे आम्ही डोळ्याने बघितले आहे. आम्ही जेव्हा उत्तर प्रदेशातील ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कार्यालयात गेलो. तेव्हा माझ्यापासून अगदी पाच फुटावर प्रेतांचा खच पडला होता.”
 
१९९२ साली उत्तर प्रदेश येथील बाबरी ढाँचा पाडला, त्याचे वर्णन नाशिकच्या अरविंद श्रीधर वर्तक यांच्याकडून ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. वय वर्षे ८३ असलेल्या वर्तक काका यांना अजूनही जसेच्या तसे सर्व आठवते. न विसरता सर्व गोष्टी त्यांना लख्ख आठवतात. बाबरीचा घुमट पाडला गेला, तेव्हा तेथे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा पठण सुरु असल्याचे ते सांगतात. कार सेवा केलेले वर्तक काका यांना चालता यायला लागले, तेव्हापासून ते वडील श्रीधर वर्तक यांचे बोट पकडत उद्यान शाखेमध्ये जायला लागले. श्रीधर वर्तक हे रा. स्व. संघाचे तालुका संघचालक होते. वडिलांनी दाखवलेल्या मार्गावरच वर्तक काका यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे. त्यांनी १२ वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. १९७६ साली वर्तक काका यांनी ‘गणेश सेल्स कार्पोरेशन’ नावाची संस्था सुरु केली. व्यवसायाबरोबरच वर्तक काका यांचे जनसेवेचे कामही सुरुच होते.
 
१९८० सालापासून वर्तक काका यांनी ‘विश्व हिंदू परिषदे’चे काम करायला सुरुवात केली. त्या आधी काका संघाचे काम करायचे. व्यवसायातून मोकळे झाल्यानंतर वर्तक काकांनी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या माध्यमातून वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यासाचे अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली. न्यासाच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा आणि हरसूल येथे २५ देवळांमध्ये मारुतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे काम केले. तसेच सुरगाणा तालुक्यातील बर्डीचा पाडा आणि लहान घोडी ही दोन गावे दत्तक घेतली. लहान घोडी येथेच विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. तसेच सुरगाणा तालुक्यातीलच गुही गावामध्ये कृष्ण मंदिर उभारण्याचे काम केले.
 
मधल्या काळात दोन वनवासी आणि तीन अल्पसंख्याक मुलींचे हिंदू मुलांसोबत लग्न लावून देण्याचे त्यांनी काम केले. पाच मुली दत्तक घेत त्यांना नोकरीला लावून देण्याचेही काम केले. यासाठी त्यांना ‘विश्व हिंदू परिषदे’चे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. ‘लोकांचे सहकार्य मिळत गेले मी काम करत गेलो,’ असे वर्तक काका आपल्या कामाबद्दल बोलताना सांगतात. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या ३० मुलींची सोडवणूक करण्याचे काम केले. त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करत त्यांचे लग्न अहमदाबाद येथे लावून दिले. त्याचप्रमाणे ‘एमबीए’चे शिक्षण घेत असलेली अल्पसंख्याक मुलगी आणि हिंदू मुलाचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या मुलीचे हिंदू धर्मात परिवर्तन करुन देत त्या जोडप्याला बडोदा येथे नोकरी लावून दिली. त्यांना वार्‍यावर न सोडता, त्यांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना आधार दिला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन मिशनरीमार्फत धर्मांतर घडवून आणले जात होते. तसेच सरकारी योजनांद्वारे फायदा देण्याचा भ्रम पसरविण्यात येत होता. याला आळा घालण्यासाठी सुरगाण्यासारख्या वनवासी भागात काम करुन वर्तक काका यांनी हिंदूंचे धर्म परिवर्तन रोखण्यासाठी प्रयत्न केले. आयुष्यभर ‘विश्व हिंदू परिषदे’चे काम केलेल्या वर्तक काका यांना आता अध्यात्माला शरण जाण्याचा मानस आहे. जाईल त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे वर्तक काका वयाच्या ८३ वर्षी न थकता दररोज एक तास पोहण्यासाठी जातात. या वयातदेखील त्यांनी पोहण्याच्या स्पर्धेत ८० पदके मिळविली आहेत. अशा या हरहुन्नरी वर्तक काका यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!
 
विराम गांगुर्डे