‘श्रीलंकन एअरलाईन्स’ची श्रीरामकथेवर जाहिरात; भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
14-Nov-2024
Total Views |
कोलंबो : (Srilankan airlines) रामकथेच्या माध्यमातून ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ केवळ पर्यटकांना आकर्षित करणार नाही, तर भारतीयांच्या मनावरही खोल प्रभाव टाकत आहे. अवघ्या पाच मिनिटांत रामायण ही कथा नसून भारतीय आणि श्रीलंकेच्या इतिहासाचा एक अस्सल दस्तऐवज आहे, ज्याने श्रीलंकेच्या मोहक प्रवासाला प्रेरणा दिली, यावर संपूर्ण जगाचा विश्वास बसला आहे.
या जाहिरातीमुळे केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांच्या मनात एकदातरी श्रीलंकेला भेट देण्याची आणि इतिहासाची ही दुर्मीळ पाने उलटण्याची इच्छा जागृत झाली आहे. इंटरनेटवर या जाहिरातीला मिळालेले कोट्यवधी हिट्स याची साक्ष देतात. ‘इंस्टाग्राम’वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक भारतीय आजी आपल्या नातवाला एका कथेच्या पुस्तकातील रामायणाबद्दल सांगत आहे. ती सांगते की, आजही रामायणात सांगितलेली ठिकाणे श्रीलंकेत अस्तित्वात आहेत. दैत्य राजा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेला कुठे नेले होते, हेही ती सांगते, असे दाखविण्यात आले आहे.
कथा अॅनिमेशनच्या मदतीने सांगितली जात असून निसर्गरम्य सहलीमध्ये इलाजवळील रावणाची गुहादेखील आहे. रावणाने सीतेला अशोक वाटिकेत नेण्यापूर्वी तिथे नेले होते. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सीता अम्मान मंदिर दाखवले आहे. त्यानंतर आजी सांगते की, भगवान रामाच्या माकड आणि अस्वलांच्या सैन्याने भारताला लंकेशी जोडणारा, रामेश्वरम्पासून श्रीलंकेच्या समुद्रापर्यंत असलेला रामसेतू आजही पाहायला मिळतो.