नमस्कार! सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन!
मी, मैत्रेय दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवाराच्या वतीने, 'तरुण भारत' सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आम्हाला आज आमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. काही आध्यात्मिक मर्यादा असल्यामुळे स्वतः प्रत्यक्ष हजर राहता आले नाही, त्याबद्दल क्षमा असावी. परंतु आजचा विषय हा सद्य वेळेस अनुरूप आणि अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने, आपले मत मांडण्यापासुन स्वतःला रोखता आले नाही.
भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाने विश्वगुरूची भुमिका निभावण्यासाठी आजचा हा विषय फार मोलाचा ठरतो. आपली पुढील घडणारी वाटचाल ही आजच्या ह्याच विषयावर अवलंबून आहे . माझे मतदान आणि देशाचे भविष्य यातील संबंध समजणे हे नितांत गरजेचे ठरते. आपल्या देशाने राजेशाही पाहिली, हुकूमशाही पाहिली, परकीय आक्रमणे देखील सोसली. “माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः” – "भूमि ही माझी माता आहे, मी पृथ्वीचा पुत्र आहे" अशा ह्या आपल्या भारतीय संस्कारात वाढलेल्या सर्व सुपुत्रांसाठी पारतंत्र्य हे असह्य कष्टप्रद व वेदनादायी होते.
स्वतंत्र भारत ही कल्पनाच त्या काळी मुक्त करणारी आणि आनंद देणारी होती. परतंत्र भारत आणि स्वतंत्र भारत ह्यात मूळ भेद अधोरेखित करतो तो म्हणजे मतदानाचा हक्क! स्वतः कधीही निवड करण्याची शक्ती नसण्याऱ्या जनतेला पहिल्यांदा निर्णय घेण्याचा हक्क मिळाला होता. तेव्हा राजा निवडता येत नव्हता पण आज मतदानाद्वारे ते शक्य आहे. मतदानाचा हक्क न बजावणे म्हणजे परकीय राजवटीत राहण्यासारखे आहे. स्वतंत्र भारताचा नागरिक असल्याची खरी ओळख ही मतदान करणे होय. म्हणून स्वतःची खरी ओळख करून घ्या आणि स्वतंत्र भारताला समृद्ध करण्यासाठी आपले आद्य कर्तव्य पूर्ण करा.
मतदानाचा अधिकार ही एक अशी शक्ती आहे जी गरीब आणि श्रीमंत यांना एक समान करते. प्रत्येकाच्या मताची किमंत ही एक समानच आहे. भारताच्या राष्ट्रपतींपासून ते दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या वनवासींच्या मताचे सामर्थ्य एक समानच आहे. ह्या शक्तीचा उपयोग न करणे म्हणजे आपल्या देशाप्रति असलेले कर्तव्य न करण्यासारखे आहे. भारतीय नागरिक म्हणून असणारी आपली ओळख पुसून टाकण्या समान आहे. राष्ट्रधर्म पालन न करणे हे पापसमानच होय.
आता आपण एक काल्पनिक चित्र समजण्याचा प्रयत्न करू. द्वापर युगाच्या अंती श्रीकृष्णांना कलियुगाविषयी कोणता सूचक प्रश्न पडला असेल, याबद्दल आपण विचार करू. कौरवांचा व अनेक असुरांचा अंत झाल्यावर, श्रीकृष्णांना भविष्यातून अलगद डॊकावण्यारा कलीच्या प्रसाराची चिंता लागली असेल.
श्रीकृष्णांचे मंथन:
“भयानक, प्रचंड पण न दिसणाऱ्या अदृष्य कलीचा शेवट कसा करता येईल ? मानवाच्या मनात दडलेल्या कलीचा अंत कसा करता येईल?
संपूर्ण जग विनाशाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या कलीचा अंत कसा करता येईल ? जेव्हा आसुरी शक्तींची दहशत शिगेला पोहोचली असेल, अधर्माचा स्वैराचार वाढलेला असेल व नैतिकतेचा ऱ्हास झाला असेल तेव्हा कलिच्या रूपात वावरणाऱ्या असंख्य कौरवांना ओळखून
त्यांचा अंत करणे मलाही फार कठीण जाईल. पण हेही तितकेच खरे आहे की मी परमात्मा या नात्याने सज्जनांच्या हृदयात सदैव वास करतो.
असंख्य कौरवांचा पराभव करण्यासाठी मी माझ्या तर्जनीने धरलेल्या सुदर्शन चक्राची शक्ती सज्जनांना बहाल करण्यावाचून पर्याय नाही .”
मित्रांनो, हाच तो परमात्म्याचा निर्णय आहे. आपल्या तर्जनीतील सुदर्शन रूपी शक्तिने मतदानाच्या माध्यमातून असुरांचा अंत करण्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारताचे सच्चे आणि जागरूक नागरिक म्हणून आपल्याला ह्याची अंमलबजावणी करता आलीच पाहिजे. आपल्याकडे २००४ साली कर्नाटकात आणि २००८ साली राजस्थानात असे उदाहरण पाहण्यास मिळाले आहेत कि जेथे उमेदवार निव्वळ एका मताच्या फरकाने जिंकले आहेत. आणि जर मतांची बरोबरी झाली तर त्याचा निर्णय हा नाणेफेकीने केला जाण्याची शक्यता ही नेहमीच असते. स्वतंत्र भारतातील सरकारी यंत्रणा नाणेफेक करून निवडून येते ही अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक घटना आहे. अशा या परिस्थितीचे कारण हे केवळ आपला निष्काळजीपणा आणि आळशी शरीर आहे. त्यामुळेच, एक अध्यात्मिक आणि जबाबदार संस्था म्हणून मैत्रीबोध परिवार सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबासह मतदान अवश्य करावेच ही कळकळीची विनंती करीत आहे.
श्रीकृष्णांनी प्रत्येकाच्या हाती सोपवलेल्या या सुदर्शन चक्राचा वापर अवश्य करा.
आपला मित्र
आपला सेवक
मैत्रेय दादाश्रीजी