फेब्रुवारीत जीटीबी नगरच्या पुनर्विकासाचा नारळ फोडणार - देवेंद्र फडणवीस

प्रतिक्षानगर ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन

    13-Nov-2024
Total Views |

dcm
  
मुंबई : ( GTB Nagar Redevelopment ) बहुप्रतिक्षित 'जीटीबी' नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात या प्रकल्पाचा नारळ फोडण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी दिली. तसेच बीडीडी चाळींच्या धर्तीवर गतिमान प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.
 
सायन कोळीवाडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्या प्रचारार्थ सायन येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर यांच्यासह महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, "या मतदारसंघातून अनेकजण इच्छुक होते. प्रसाद लाड यांनी तिकिट मागितले, मी त्यांना सांगितले, तुम्ही एका मतदारसंघात अडकून पडू नका. तुम्हाला अनेक मतदारसंघात काम बघायचे आहे. शिरवडकर यांनीही तिकिट मागितले. परंतु, माझ्या विनंतीनुसार सेल्वन यांना समर्थन दिले. ज्येष्ठ नेते रवी राजा यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महायुतीच्या एकीचे बळ सेल्वन यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करेल."
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "निर्वासित सिंधी बांधवांसाठी विशेष कायदा तयार करून आम्ही त्यांना जमिनीचा मालकी हक्क दिला. प्रतिक्षानगर ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे याच ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना त्यांची हक्काची घरे देण्याचा शब्द मी आज देत आहे. म्हाडाच्या जटील नियमांमुळे काही ठिकाणी पुनर्विकास अडचणी येत आहेत. ते नियम बदलण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मुंबईतील सामान्य माणसाला दुप्पट ते तिप्पट आकाराचे घर देण्याचा आमचा मानस आहे." तसेच सायन-कोळीवाड्यातील मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा महायुती सरकारचा संकल्प असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.