जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार!

नायब सिंग सैनी यांचा हल्लाबोल

    13-Nov-2024
Total Views |
Nayab Singh

मुंबई : “काँग्रेस ( Congress ) जिथे जिथे सत्तेत होती, तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये खोटी आश्वासने दिली आणि भ्रष्टाचार करून लोकांना लुटले,” असा घणाघात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केला आहे. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

नायब सिंह सैनी म्हणाले की, “काँग्रेसने देशात अनेक वर्षे राज्य केले. परंतु, २०१४ ते २०२४ सालच्या या मागील दहा वर्षांत जी विकासाची गती पाहायला मिळाली, ती काँग्रेसच्या काळात नव्हती. काँग्रेस हवेत काम करते आणि भ्रष्टाचार वाढवण्यासाठी काम करते. मात्र, मोदीजी आणि भाजप विकासाची गती वेगाने वाढवत सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करण्याचे काम करत आहे. याचाच परिणाम म्हणून हरियाणामध्ये तिसर्‍यांदा भाजपचे सरकार बनले. मोदीजींनी प्रत्येक वर्गासाठी काम केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक आणले. तसेच अनेक योजना आणत महिलांना सशक्त करण्याचे काम केले. विविध योजनांद्वारे युवकांना रोजगार देण्यात येत आहे.” “काँग्रेस जिथे जिथे सत्तेत होती तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. परंतु, ती जास्त काळ चालत नाहीत.

काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये खोटी आश्वासने दिली. हिमाचलमध्ये काँग्रेसने महिलांना दोन हजार रुपये आणि युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. खोटे बोलून मते घेतली आणि सरकार येऊन दोन वर्षे झाल्यानंतरही कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. काँग्रेस भ्रष्टाचार करून लोकांना लुटण्याचे काम करते,” अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “मोदीजींनी दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण केलीत. रस्ते आणि रेल्वेची कामे पाहता नरेंद्र मोदींच्या डबल इंजिन सरकारने देशाला जवळ आणण्याचे काम केले. काँग्रेसच्या काळात ५५ वर्षात केवळ ७० विमानतळे होती. मात्र, या दहा वर्षात १५० पेक्षा जास्त विमानतळे लोकांच्या सेवेत आहेत.”

‘एक’ राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार

ठाणे : “देशाचे तुकडे करायची भाषा करणार्‍याच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तेव्हा ‘एक’ राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार आहे,” असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे हरियाणा येथील खा. डॉ. हेमांग जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉ. समिरा भारती आदी उपस्थित होते.