जनतेच्या पाठीशी नव्हे, सोबत उभी राहणार : यामिनी जाधव
12-Nov-2024
Total Views |
मुंबई : जनतेच्या सुखदु:खात त्यांच्या पाठीशी नव्हे, तर सोबत उभे राहण्याची भावना भायखळा विधानसभेच्या आमदार तथा शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव ( Yamini Jadhav ) यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रचाराला थोडेच दिवस शिल्लक आहेत कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरत आहात आणि मतदारांचा प्रतिसाद कसा आहे?
प्रचार छान सुरू आहे. पाच वर्षांचा अनुभव असल्याने मुद्दे काही वेगळे नाहीत. त्यामुळे कोणती कामे झाली आणि कोणती राहिलीत हे सर्व डोक्यात आहे. मतदारांनासुद्धा हे माहिती आहे. त्यामुळे वेगळे मुद्दे घेऊन जाण्याची गरज नाही. पक्षाचा एक वचननामा असतो. परंतु, उमेदवाराचा वचननामा नसावा. उमेदवार निवडून आल्यानंतर त्याच्या मतदारांच्या गरजेनुसारच त्याचा वचननामा हवा आणि तो परिस्थितीनुसार बदलायला हवा, असे मला वाटते.
भायखळा मतदारसंघात यंदा शिवसेना आणि उबाठा गटात थेट लढत होणार आहे. विरोधकांच्या आव्हानाकडे कसे पाहता?
विरोधकांचा विचार करण्याची मला काहीच गरज नाही. मी पाच वर्षे काम केले आणि माझ्याकडे कार्य अहवालदेखील आहे. लोकांना गरज असते तेव्हा आम्ही उपलब्ध होत नाही, असा आरोप विरोधकांनी केला. परंतु, केवळ गरजेच्या वेळीच नाही, तर लोकांच्या सुख-दु:खात मी सर्वांना भेटत असते.
लोकसभेला भायखळ्यातून पिछाडी मिळाली होती. त्याची कारणे काय आहेत? विधानसभा निवडणुकीत मतांची ही तूट कशी भरून काढणार आहात?
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत फरक असतो. लोकसभेच्या वेळी संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार, असे कितीतरी फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे ’जब तक सुरज चाँद रहेगा, संविधान यहीं रहेगा’ हे सांगितले आहे. विरोधकांनी पसरवलेल्या नॅरेटिव्हमुळे त्यांना लोकसभेत फायदा झाला. पण, विधानसभेची निवडणूक ही लोकप्रतिनिधीच्या उपलब्धतेवर आणि तो फक्त चांगला वक्ता आहे की, कानसेनसुद्धा आहे यावर अवलंबून असते.
या ठिकाणी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी कसा पाठपुरावा करणार?
मी पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे. राज्यपालांच्या सहीने गृहनिर्माण धोरण केंद्रात गेले होते. त्यावर राष्ट्रपती महोदयांची सही होणे गरजेचे होते. ती सही लवकरात लवकर करावी, अशी मागणी मी केली. त्या एका गोष्टीची दक्षिण मुंबई चातकासारखी वाट बघत आहे. हे सुधारित धोरण आल्यास दक्षिण मुंबईचा पुनर्विकास सोपा होईल.
‘लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरताना दिसत आहे. मतदारांच्या काय भावना आहेत?
मतदारांच्या भावना फार छान आहेत. अगदी उबाठा गटाच्या महिलांनीसुद्धा या योजनेचा फायदा घेतला आहे. मुस्लीम भगिनींनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. कारण, ही योजना एखाद्या विशिष्ट समाजासाठी नव्हती; तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक अशी ही योजना आणली आहे.
भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांचे व्हिजन काय?
लोकांची कामे करणे, त्यांच्या उपयोगी येणे, त्यांना हव्या असलेल्या गोष्टीत त्यांची साथ देणे, हे माझे उद्दिष्ट आहे. तसेच, लोकांच्या सुख-दु:खात सोबत राहणे आणि जिथे माझी गरज पडेल तिथे त्यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत उपस्थित राहणे, ही माझी भूमिका आहे.