‘वक्फ बोर्डा’विरोधात हजारो चर्च एकवटले

केरळमधील जमिनींवर कब्जा केल्याने गावकरी संतप्त

    12-Nov-2024
Total Views |
Waqf Board

कोची : ‘वक्फ बोर्ड ( Waqf board ) सुधारणा विधेयका’ला मुस्लीम समाजाचा विरोध आहे. तर, हिंदू संघटनाही विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु, केरळमध्ये ‘वक्फ बोर्डा’च्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चनी मोर्चा उघडला आहे. केरळमधील या चर्चच्या लोकांनी आरोप लावला आहे की, ‘वक्फ बोर्ड’ मोठ्या प्रमाणात गावकर्‍यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावाची दोन गावे आहेत.या गावातील गावकर्‍यांच्या जमीन आणि मालमत्तेवर ‘वक्फ बोर्डा’ने बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

त्यामुळे गावकर्‍यांनी ‘वक्फ बोर्डा’विरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात ख्रिश्चन कुटुंबे राहात आहेत. दीर्घकाळ ते त्यांच्या मालमत्तेवर सरकारी करही भरत असून त्यांच्याकडे कागदपत्रेही आहेत. मात्र, आता या जमिनीवर ‘वक्फ बोर्डा’ने दावा केला आहे. जमिनीची नोंदणी स्थानिक गावकर्‍यांच्या नावे आहे, मग त्यावर ‘वक्फ बोर्ड’ दावा कसे करू शकते, असा सवाल या गावकर्‍यांनी केला आहे. या मुद्द्यांवरून सध्या चांगलेच राजकारण पेटले आहे. केरळमध्ये ज्या जमिनीवर ‘वक्फ बोर्ड’ दावा करत आहे, त्यावर कित्येक पिढ्या ख्रिश्चन कुटुंबे राहात आहेत.

आंदोलन आणखी चिघळणार

‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या दाव्यामुळे हा विषय इतका चिघळला आहे की, ख्रिश्चन कुटुंबांच्या अनेकांनी याविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे. जर हा मुद्दा निकाली काढला नाही, तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिरो मालाबार चर्चचे मुख्य मेजर आर्कबिशप राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुनंबमप्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या दाव्याविरोधात रविवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी जे आंदोलन झाले, त्याचे नेतृत्व सिरो मालाबार चर्चने केले.