सिग्नलमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेसेवा खोळंबली

कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड

    12-Nov-2024
Total Views |

western railway
मुंबई, दि.१२ : प्रतिनिधी कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रभावित झाली. मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली, मात्र यादरम्यान बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.

कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात मंगळवार, दि.१२ रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास पॉइंटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धीम्या आणि जलद मार्गाने बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या थांबवण्यात आल्या. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे दुरुस्ती पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून दुरुस्तीचे काम सुरू केले. धीम्या आणि जलद मार्गाच्या सांध्यातील दोषांमुळे दुरुस्तीच्या कामाला वेळ लागला. संध्याकाळी ७.३०च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करता आला, त्यानंतर धीम्या आणि जलद लोकल ट्रेनची सेवा हळूहळू पूर्ववत सुरू झाली.

गर्दीच्या वेळी विरारकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि वांद्रे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोरिवली लोकल ट्रेनही रद्द केल्याची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली. गर्दीच्या वेळी या कोंडीमुळे बोरिवली-विरारकडे जाणाऱ्या लोकल रात्री उशिरापर्यंत धावत होत्या. लोकल ट्रेनच्या विलंबामुळे रेल्वे स्थानकांवर आणि सामान्य लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, या गोंधळाचा फायदा घेत फर्स्ट आणि सेकंड क्लासचे तिकीट-पासधारक वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये घुसले आणि प्रवास करू लागले.