खासदार वर्षा गायकवाड यांच्या पतीची मुजोरी; श्री. श्री. रविशंकर यांची गुरुपूजा पाडली बंद
12-Nov-2024
Total Views |
मुंबई : हिंदू सण - समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता सत्संगालाही (Hindu Satsang) विरोध करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे आयोजित श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दीड हजारांहून नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरू असताना, वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे आणि त्यांचे कार्यकर्ते आत घुसले आणि दादागिरी करीत गुरुपूजा बंद पाडली. या कार्यक्रमाआडून मतदारांना प्रलोभन दाखवले जात असल्याचा बनाव त्यांनी रचला. कुकर आणि पैसे वाटप केल्याचा आरोपही करण्यात आला.
त्यामुळे पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी कार्यक्रम स्थळ आणि आयोजकांशी संबंधित सर्व ठिकाणांची कसून तपासणी केली. मात्र, पैसे किंवा भेटवस्तू वाटपाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. तरीही केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी गायकवाड कुटुंबीयांकडून अशाप्रकारचा बनाव रचण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या पतीच्या गुंडांच्या टोळीने कार्यक्रम स्थळाला वेढा घातला. त्यामुळे तेथे जमलेले दीड हजार भक्तगण बिथरले. गायकवाड यांचे गुंड कधीही अंगावर धावून येतील, अशी स्थिती होती, अशी माहिती आयोजक प्रशांत व्हटकर यांनी दिली.
दर आठवड्याला सत्संगाचे आयोजन
निवडणूक आयोगाने आमचा सगळा कार्यक्रम रेकॉर्ड केला आहे. राजू गोडसे यांच्या आरोपानुसार आम्ही पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप केले असते, तर त्याचे चित्रण झाले असते. परंतु, आयोगाच्या तपासणीदरम्यान सगळे आरोप खोटे असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही असा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला नाही. दर आठवड्याला धारावीत आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आम्ही कोरोनाकाळात अन्नधान्याची १ लाखांहून अधिक पाकिटे वाटली, तेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन आमदार मतदारसंघात फिरकत नव्हत्या. आता केवळ राजकीय हेतूने बनाव रचून बदनाम केले जात आहे. या कृत्याबद्दल मी संपूर्ण गायकवाड कुटुंब आणि राजू गोडसे यांचा तीव्र निषेध करतो.
-प्रशांत व्हटकर, आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर, धारावी
हिंदू युवकाची हत्या झाली तेव्हा गायकवाड कुठे होते?
काही महिन्यांपूर्वी धारावीत अरविंद वैश्य नामक युवकाची जिहाद्यांकडून हत्या करण्यात आली. त्याच्या अंत्ययात्रेवरही कट्टरपंथींनी दगडफेक केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न वर्षा गायकवाड यांनी कधी केला नाही. पण, मशिदीवरील तोडक कारवाई थांबवण्यासाठी ताबडतोब धावत आल्या. हिंदूंच्या कानठळ्या बसवणाऱ्या किंचाळ्यांकडे त्यांनी का दुर्लक्ष केले, याचे उत्तर वर्षा गायकवाड आणि त्यांच्या गुंडांनी द्यावे.
काँग्रेसचे स्पष्टीकरण
संबंधित कार्यक्रमाचा आयोजक शिवसेनेच्या उमेदवाराचा जाहीर प्रचारक आहे. त्या कार्यक्रमात शिवसेनेचा उमेदवार उपस्थित होता. 'धारावी परिवर्तन महासभा', या नावाने कोणता सत्संग आयोजित केला जातो? काँग्रेसविरोधात मतदान करा, असे आवाहन कोणत्या धार्मिक कार्यक्रमात केले जाते? धारावीतील मतदारांना प्रलोभन दाखवून तेथे बोलावले गेले, त्याचे व्हॉट्सअॅप पुरावे आम्ही निवडणूक आयोगाला दिले आहेत. या कार्यक्रमात ज्या साहित्याचे वाटप झाले, त्याचे पैसे अदानीकडून आले, असा आमचा थेट आरोप आहे. याआधीही महिला मंडळाच्या कार्यक्रमात साहित्य आणि अन्न धान्याची पाकिटे वाटली गेली. त्याचे पुरावे देऊनही निवडणूक आयोग कारवाई करीत नाही.