वक्फ अ‍ॅक्ट पूर्णतः नष्ट झाला पाहिजे : अ‍ॅड. विष्णू शंकर जैन

    10-Nov-2024
Total Views |
Vishnu shankar jain

मुंबई : “वक्फ बोर्ड’ सुधारणा विधेयक आणण्याची मुळात गरजच नाही. कारण, संविधानात ‘वक्फ’ शब्दाचा उल्लेखच नाही. त्यामुळे ‘वक्फ अ‍ॅक्ट १९९५’ पूर्णतः नष्ट झाला पाहिजे,” असे स्पष्ट मत हिंदू मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अ‍ॅड. विष्णू शंकर जैन ( Vishnu Shankar Jain ) यांनी व्यक्त केले.

श्री माटुंगा कच्छी मूर्तिपूजक जैन श्वेतांबर संघ आणि श्री माटुंगा जैन श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ यांच्यावतीने शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी ’सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्थान : जागृती व चुनौतियाँ’ या विषयावर अ‍ॅड. विष्णू शंकर जैन यांचे विशेष व्याख्यान माटुंगा सेंट्रल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्म आणि राष्ट्ररक्षणासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.

‘वक्फ बोर्ड’ आणि ‘वक्फ कायद्या’चा उल्लेख करत त्याची कायदेशीर बाजू विष्णू शंकर जैन यांनी उपस्थितांसमोर मांडली. त्याचबरोबर वक्फचे सध्याचे भीषण वास्तव त्यांनी समोर आणले. ते म्हणाले, वक्फ बोर्ड हे एक भीषण प्रकरण असून, आजची मोठी समस्या बनली आहे. २००८ ते २०२४ या कालावधीत वक्फची मालमत्ता १२ लाख एकरपर्यंत येऊन पोहोचली आहे. एकाअर्थी या कायद्याचा गैरमार्गाने वापर होतोय हे यातून स्पष्ट दिसते.

जागोजागी मजार बांधून ‘लॅण्ड जिहाद’ करण्याचा प्रयत्न

“बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे. तशी परिस्थिती भारतात होऊ नये यासाठी हिंदूंना संघटित व्हावे लागेल. चुकीच्या पद्धतीने जागोजागी मजार बांधून लॅण्ड जिहाद करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, कायदेशीररित्या सामान्य नागरिक त्याविरोधात आवाज उठवून संबंधित उच्च न्यायालयात जाऊन तक्रार दाखल करू शकतात,” असे जैन यांनी सांगितले.