मराठी दिवाळी अंकांची तेजोमय परंपरा

    01-Nov-2024
Total Views |
marathi diwali ank
 

दीपावली म्हटले की, प्रत्येकाच्या मनात उत्साह् असतोच. प्रत्येकालाच या सणाला साजरे करण्याचे वेध लागतात. गोड धोड पदार्थ, भेटवस्तू, याबरोबरच दिवाळी अंक हा देखील दिवाळीचे अभिन्न अंगच जणू! या दिवाळी अंकाला एक परंपरा आहे. या परंपरचे पाईक होत असंख्य प्रकाशने आज त्यांचे अंक वाचकांच्या सेवेत आणत आहेत. दिवाळी अंकाच्या प्रवासाचा हा आढावा...

दिवाळी हा आपल्या देशातील महत्त्वाच्या सणांपैकी एक. या सणाच्या दिवसात आपण लावत असलेल्या दिव्यांनी, आपले घर, अंगण उजळून जाते. दिवाळीत लावले जाणारे दिवे,पणत्या जसे घर, अंगण प्रकाशित करतात, तसेच दिवाळीत प्रकाशित होणारे ‘दिवाळी अंक’ आपले आयुष्य प्रकाशमान करतात. या दिवाळी अंकांमध्ये असणारे आपल्या आवडत्या लेखकाचे लेख, आवडत्या कवीच्या कविता, दिवाळीत खाल्ल्या जाणार्‍या चविष्ट फराळासारख्याच असतात. कारण ते लेख, कविता आणि दिवाळी अंकात छापून येणारे एकंदरीत सर्व प्रकाराचे साहित्य, वाचक म्हणून आपली बौद्धिक भूकही भागवत असतात. आपल्या देशात दिवाळीची परंपरा फार जुनी आणि समृद्ध आहे, तशीच आपल्या देशातील दिवाळी अंकांनाही समृद्ध अशी परंपरा आहे. ‘मराठी भाषेतील दिवाळी अंक’ ही त्याच समृद्ध परंपरेचा एक भाग आहेत.

1905 साली श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या ’मित्रोदय’ या मासिकाने, दिवाळी विशेष अंक काढला होता. ’नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ’ असा उल्लेख या मासिकावर होता. 24 पानांच्या त्या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध होते. 16 मराठी पाने आणि आठ इंग्रजी पाने, अशी त्याची मांडणी होती. दिवाळीनिमित्त असला तरी, तो मासिकाचा अंक होता. रूढार्थांने ज्याला आपण ‘दिवाळी अंक’ म्हणतो, तसा तो नव्हता. 1907 आणि 1906 साली दिवाळी दरम्यान, वा. गो. आपटे यांच्या संपादनाखाली प्रकशित होणार्‍या ‘आनंद’ मासिकातून, दिवाळीनिमित्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते. दिवाळीनिमित्त असे विशेष लेखन अनेक वर्ष, अनेक नियतकालिकांमधून कमी-अधिक प्रमाणात सुरू होते. दिवाळीनिमित्त प्रकाशित होणार्‍या या विशेष लेखनाला, जरी आज आपण ‘दिवाळी अंक’ म्हणत नसलो किंवा ‘दिवाळी अंकाचा’ बहुमान त्याकाळी त्याला मिळाला नसला, तरीही मराठी दिवाळी अंकाची बीजे याच लेखनात पेरली गेली होती आणि त्यातूनच पुढे 1909 मध्ये , पहिला मराठी अंक प्रकाशित झाला.

19व्या शतकात ‘मासिक मनोरंजन’ तर्फे 1909 साली पहिला दिवाळी काढण्यात आला. ‘मासिक मनोरंजन दिवाळी अंक’ असे त्याचे नाव होते. काशिनाथ रघुनाथ आजगावकर म्हणजेच का. र. मित्र यांनी, या पहिल्या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशनाचे काम सांभाळले होते. पाश्चात्य साहित्याचा अभ्यास करताना, त्यांना ही मराठी दिवाळी अंकाची कल्पना सुचली होती. इंग्रजीमध्ये जसा ‘ख्रिसमस अंक’ निघतो, तसा आपल्याकडे ‘दिवाळी अंक’ का काढू नये? हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी पहिला दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आणला. या पहिल्या मराठी दिवाळी अंकात, अनेक प्रसिद्ध लेखक-कवींचे लेख छापले गेले होते. बालकवींची ‘आनंदी-आनंद गडे’ ही कविताही, त्यातूनच वाचकांच्या भेटीला आली होती. का. र. मित्र यांचा ‘मराठी दिवाळी अंकाचा’ प्रयोग, मराठी साहित्य विश्वात यशस्वी ठरला. मनोरंजनाच्या दिवाळी अंकांनंतर, मराठी भाषेत अनेक दिवाळी अंक निघाले.

दिवाळी या सणाची लोक जितक्या आतुरतेने वाट पाहत असतात, तितक्याच किंबहुना त्याहून अधिक आतुरतेने, वाचक त्यांच्या आवडत्या दिवाळी अंकाची वाट पाहू लागले. वाचकांची आवड आणि त्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, दिवाळी अंकांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले. परंपरेनुसार कथा, कविता तर त्या अंकांमधून प्रसिद्ध होतच होत्या. पण, नंतरच्या काळात त्याची व्याप्ती वाढली. कथा, कवितांसोबतच चित्रे, कोडी, विविध विषयांवरचे लेख, व्यंगचित्रे अशा अनेक गोष्टींना, या दिवाळी अंकांमध्ये स्थान मिळू लागले. विविध साहित्यप्रकारांसोबतच विविध विषयही या दिवाळी अंकांनी हाताळले. साहित्यिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सर्व विषयांना, या दिवाळी अंकांनी गवसणी घातली. हा व्याप इतका वाढत गेला की, प्रत्येक विषयावरचे स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागले. दिवाळी अंक जसे वाचकप्रिय होत होते तसेच, ते लेखकप्रियही होत होते. कारण, अनेक लेखकांना आणि विशेष करून, ज्या लेखकांना स्वत:ची पुस्तके प्रकाशित करणे शक्य नव्हते, त्या लेखकांना वाचकांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी या दिवाळी अंकांमधून मिळत होती. अनेक दिग्गज लेखक-कवींचे अनेक प्रसिद्ध कथा आणि कवितासंग्रह, दिवाळी अंकांमधूनच आकाराला आले आहेत. या दिवाळी अंकांनी, अनेक लेखक-कवींना ओळख मिळवून दिलेली आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यात या दिवाळी अंकांचे खूप मोठे योगदान आहे.

1909 सालापासून सुरू झालेली मराठी दिवाळी अंकांची परंपरा, आजतागायत अविरतपणे सुरू आहे. आताच्या काळात या परंपरेचा विस्तार वाढलेला आहे. अनेक दैनिके, मासिके, संस्था-संघटनांचे दिवाळी अंक हल्ली प्रकाशित होतात. एवढेच काय तर, काही लेखक-कवी आणि प्रकाशक सुद्धा स्वत:चे विशेष दिवाळी अंक, वाचकांच्या भेटीला घेऊन येतात. मुलाखती, चर्चासत्रे, व्याखाने, राशिभविष्य, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा कितीतरी विषयांवर आता, दिवाळी अंकामध्ये लेखन होत आहे. या दिवाळी अंकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातूनही, लेखकांना लिहिण्यासाठी संधी मिळते. मराठी भाषेत आताच्या काळात, 400 हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. लेखक आणि वाचकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी भाषेच्या प्रवासात दिवाळी अंकांची भूमिका खूप मोठी राहिली आहे. या अंकांनी प्रकाशाने, लेखक आणि वाचकांच्या वाटा उजळून टाकल्या आहेत. या शंभरहून अधिक वर्षे सुरू असलेल्या, मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेचा एका लेखात आढावा घेणे शक्य नाहीच. पण, दिवाळी या सणाच्या निमित्ताने दिवाळीतील एका महत्त्वाच्या घटकाचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.


दिवाळी अंकात तरुणांचे वाढते योगदान..

‘चपराक प्रकाशन’ 2002 सालापासून दिवाळी अंक प्रकाशित करत आहे. दिवाळी अंकांच्या क्षेत्रात चपराकने एक प्रयोग असा केला आहे. त्यांनी मुद्रित, ई-बुक आणि ऑडिओ अशा तिन्ही स्वरूपात वाचकांना दिवाळी अंक उपलब्ध करून दिला आहे. 2002 सालापासून चपराकला वाचकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी असे होते की, दिवाळी अंक म्हटले की त्याचा वाचकवर्ग ठराविक होता. घरातील आजी-आजोबा किंवा फार फार तर आई-बाबा दिवाळी अंक वाचायचे. पण, आता चित्र बदलले आहे. तरुणपिढी दिवाळी अंक वाचू लागली आहे आणि दिवाळी अंकामध्ये लिहू लागली आहे. आपले प्रतिबिंब या दिवाळी अंकांमधून उमटत आहे. याचा या पिढीला खूप आनंद होतोय. आता विषय वैविध्य वाढलेले आहे. त्यामुळे विविध विषयांवर ही पिढी व्यक्त होत आहे. दिवाळी म्हणजे ‘दिवाळी अंक’ हे समीकरण आता घट्ट होत आहे.
- घनश्याम पाटील (संपादक-प्रकाशक, चपराक प्रकाशन)
 

चांगल्या दिवाळी अंकाना मागणी वाढती...

मौज’च्या दिवाळी अंकाना, सुरुवातीपासूनच वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकी वर्षे ’मौज’ने वाचकांचा विश्वास टिकवून ठेवलेला आहे. ’मौज’ दिवाळी अंकाच्या दरवर्षी, सहा हजार ते आठ हजार प्रती प्रकाशित केल्या जातात. त्या सगळ्याच्या सगळ्या प्रतींचा खप होतो. आमची एकही प्रत माघारी येत नाही. तुम्ही वाचकांना चांगलं काहीतरी वाचायला दिले, तर ते वाचतात. आमचा वाचकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही आहे.
- श्रीकांत भागवत (प्रकाशक, मौज)


दिपाली कानसे