"४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती.."; 'रामायण'च्या शूटिंगच्या आठवणी सांगताना दीपिका

    01-Nov-2024
Total Views |
 
ramayan
 
 
मुंबई : अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी साकारलेली प्रभू श्रीरामाची आणि माता सीतेची 'रामायण' मालिकेतील भूमिका आणि ती मालिका कुणी पाहिली नसेल असं शक्यच नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी रामायण या मालिकेला अतिशय श्रद्धेने आपलेसे केले होते. दरम्यान, याच मालिकेदरम्यान दीपिका चिखलिया यांनी ४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती. पण नेमकं त्याचं कारण काय होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे.
 
एका मुलाखतीत दीपिका यांनी 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान ४ वर्ष दिवाळी साजरी का केली नाही? याबद्दल उत्तर दिलं आहे. दीपिका म्हणाल्या की, "रामायण मालिकेचं शूटिंग महाराष्ट्र बॉर्डरवरील उमरगाव येथे सुरु होतं. त्यावेळी शूटिंगचं लोकेशन, कास्ट आणि क्रूचं घर सेटपासून फार लांब होतं. वारंवार घरी जायला मिळायचं नाही. आणि मुळात या मालिकेचं शूटिंग सलग ४ वर्ष सुरु होतं. त्यामुळे मला दिवाळीला कधीच घरी जायला मिळालं नाही."
 
दीपिका पुढे म्हणाल्या की, "दिवाळीला आम्ही सर्व एकत्र सेटवर असायचो. त्यावेळी सर्व कलाकार मिळून दिवाळीचा सण एकत्र साजरा करायचो. शूटिंगचं शेड्यूल खूप व्यस्त असल्याने घरी कुणालाच जायला न मिळाल्यामुळे सेटवरच आमची दिवाळी साजरी होत होती". दरम्यान, ‘रामायण’ ही मालिका आजवर रामायणावर आधारित आलेल्या असंख्य मालिकांमधील सर्वात उत्कृष्ट सादरीकरण होतं.