रोहित पाटलांच्या अडचणी वाढल्या! उमेदवारांच्या नामसाधर्म्यामुळे मतविभागणीची टांगती तलवार

    01-Nov-2024
Total Views |
 
rohit patil
 
मुंबई : ( Rohit R. R. Patil ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलाढाली झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर.आर.पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रोहित पाटील हे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र आहेत. रोहित पाटील यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजय पाटील आहेत.
 
रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील!
 
तासगाव-कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नामसाधर्म्य असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठे महाकाळ विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधात विरोधकाकडून रणनीती करून मतांचे विभाजन होऊन प्रमुख उमेदवाराला याचा फटका बसावा म्हणून ही शक्कल लढवली जाते.
 
लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का?
 
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाशी साधर्म्य असणाऱ्या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाला चांगलाच फटका बसला होता. तसाच काहीसा प्रकार आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चिन्हाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ओंजळीत कमी मते पडली होती. त्याचीच पुनरावृत्ती रोहित आर. आर. पाटील यांच्याबाबतीत होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.
 
खासदार विशाल पाटलांचा विश्वास
 
याचदरम्यान, नावात साम्य असलेले उमेदवार दिल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी टोला दिला आहे. ते म्हणाले की, रोहित पाटील यांना निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी खूप प्रयत्न होणार आहेत. आर.आर.आबा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असताना आर.आर.पाटील नावाचे चार उमेदवार निवडणुकीमध्ये असायचे. पूर्वी एखादा माणूस चुकत होता. मात्र आता मतपेटीवर फोटो येणार आहे. त्यामुळे रोहित पाटील यांचे चित्र दिसणाऱ्या पुढे बटण दाबून मतदान करतील असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.