लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व - प्रा. डॉ. प्रभाकर मांडे

    09-Oct-2024
Total Views |
 
Satish Gorde
 
 
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मधील शाहीर योगेश रंगमंच या नूतन प्रेक्षागृहात, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक अन् संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदानाचे एकूण १२ सत्रांच्या माध्यमातून सिंहावलोकन करण्यात आले. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत...
 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ अध्यक्ष ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ साहित्यिक व संविधान साक्षर तज्ञ ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, कार्यवाह अ‍ॅड. सतिश गोरडे व मांडे कुटुंबीय यांच्या पुढाकारातून, प्रा. डॉ. धनंजय भिसे यांच्या समन्वयातून आणि ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या सहकार्यातून हे १२ सत्रांचे चर्चासत्र संपन्न झाले.
 
वास्तविक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या हयातीतच हा सोहळा संपन्न व्हावा, असा एक वर्षापूर्वी ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, मिलिंद देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, अ‍ॅड. सतिश गोरडे यांच्या चर्चेतून हा मानस ठरला होता. परंतु, दुर्दैवाने तो सफल होऊ शकला नाही. मात्र, मांडे कुटुंबीयांसह शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ञ मान्यवरांची उपस्थिती, अन् सक्रिय सहभागामुळे एकूणच संपूर्ण सोहळा कमालीचा यशस्वी झाला. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ.अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या सोहळ्यात, ज्येष्ठ विचारवंत, संविधान साक्षर चळवळीचे ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, उद्योजक राजपाल आर्य, उद्योजक श्यामलाल मित्तल, डॉ. प्रभाकर देसाई, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. प्रवीण भोळे, धोंडीराम पवार, कृष्णा भंडलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विनोद बन्सल आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. गुरुकुलम्मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या वेदातील ऋचा, स्वागतगीत, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ची प्रार्थना, आणि मान्यवरांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला जलार्पण करून, उद्घाटन सत्राचा प्रारंभ करण्यात आला.
 
गिरीश प्रभुणे आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की, “डॉ. प्रभाकर मांडे यांचे साहित्य अन् संशोधन भटक्या, वंचित, शोषित समाजासाठी काम करताना प्रेरणास्रोत ठरले. गिरीश कुबेर यांनी दिलेल्या डॉ. मांडे यांच्या लोकरंगभूमीवरील एका पुस्तकामुळे मी त्यांच्या साहित्याकडे वळलो. पुढे प्रत्यक्ष भेट झाली अन् अनेकदा त्यांचे सान्निध्यही लाभले. दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून विविध मान्यवर अभ्यासकांनी, डॉ. मांडे यांच्या सांस्कृतिक योगदानावर ऊहापोह करावा. ब्रिटिश काळात आपल्या इतिहासाची मोडतोड झाली, त्याची मांडेंनी पुन्हा मांडणी केली आहे. परंतु, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती आता कालबाह्य झाले आहेत का? याचाही शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले. तसेच, गुरुकुलम्च्या पूर्ण वाटचालीत, डॉ. मांडे यांचा सहभाग हा ‘अनंतहस्ते देता घेशील किती दो करांनी’ अशी भूमिका मांडली, व ‘गावगाडाबाहेर’ हा आज कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक ग्रंथ बनलेले आहेत.
 
उद्योजक राजपाल आर्य यांनी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’ या संस्थेशी कशाप्रकारे स्नेहबंध प्रस्थापित झाले, याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तर उद्योजक श्यामलाल मित्तल यांनी, हरियाणातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने चालविलेल्या छोट्याशा खेडेगावातील एका शाळेने शिक्षण देऊन मला सुसंस्कारित केल्याचे मनोगत व्यक्त केले.
 
आपल्या उद्घाटनपर मनोगतातून डॉ. अरुणा ढेरे यांनी, “माझे वडील डॉ. रा. चिं. ढेरे यांचे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांचे घनिष्ठ अनुबंध होते. त्यामुळे त्यांचा उल्लेख करताना अनौपचारिकपणे माझ्याकडून ’मांडेकाका’ असेच संबोधले जाते. मांडेकाकांकडे जाणे म्हणजे एखाद्या वाघाच्या गुहेत जाण्यासारखे होते. कारण, लोकपरंपरेचे अगाध ज्ञान त्यांच्याकडे होते. मानवी जीवनाच्या वर्तन व्यवहारासोबत त्याच्या लोकव्यवहाराचा अन्वयार्थ, डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या साहित्यातून आणि संशोधनातून लावला होता. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून विद्यापीठाने लोकसाहित्याची शाखा सुरू केली. तसेच, शासनाने लोकसाहित्य समितीसारखे मोठे काम कार्यान्वित केले. समाजाला एकसंध ठेवायचे असेल, तर लोकसंस्कृतीच्या धाग्यांची वीण आवश्यक आहे. भौतिक समृद्धीची असंख्य साधने असताना, अंतःसंस्कृती आणि अंतर्दृष्टीच्या विकासासाठी डॉ. मांडे यांच्या लोकसाहित्य अन् लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे अभिजन आणि बहुजन यांच्या संस्कृतीची एकत्रित बांधणी करणे शक्य होईल!” या सत्रात डॉ. प्रभाकर मांडे लिखित ’गावगाड्याबाहेर’ या ग्रंथाचा गौरी डोखळे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, आणि लोकसाहित्याच्या अभ्यास वाटेवर’ या दोन ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “परंपरा आणि नवता यांचा समन्वय डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सांस्कृतिक संशोधनातून अधोरेखित होतो. भारतीय लोकसंस्कृती आणि लोककलांविषयीचे हे दोन दिवसीय चर्चासत्र महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना या साहित्यसंस्कृतीचे संचित निश्चित उपयोगी आहे.” स्मिता जोशी यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.
 
उद्घाटनसत्रानंतर दुसर्‍या सत्रात ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे आणि प्रा. डॉ. धनंजय भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, ’डॉ. प्रभाकर मांडे यांची लोकरंगभूमी मीमांसा’ या परिसंवादात ‘मुंबई विद्यापीठ लोककला विभागा’चे माजी प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. प्रवीण भोळे, रवींद्र गोळे, महादेव गायकवाड यांनी मांडे यांच्या लोकरंगभूमीवरील साहित्याचे संदर्भ उद्धृत करीत भाष्य केले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. प्रकाश खांडगे यांनी “लोकरंगभूमीच्या संदर्भात डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन आणि संशोधन एखाद्या समर्पित ऋषीसारखेच होते,” असे गौरवोद्गार काढले. प्रज्ञा फुलपगार यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. डॉ. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या तिसर्‍या सत्रात, ’डॉ. प्रभाकर मांडे यांचे मौखिक वाङ्मय परंपराविषयक लेखन’ या विषयावरील परिसंवादात श्रीकांत चौगुले, डॉ. धनंजय भिसे, अश्विनी बाविस्कर, स्वप्ना झिरंगे यांनी डॉ. मांडे यांच्या ‘सांकेतिक आणि गुप्त भाषा’ या ग्रंथासह अन्य साहित्याचा ऊहापोह केला.
 
डॉ. प्रभाकर मांडे यांचे ‘गावगाड्याबाहेरील समाज व लोकमानसविषयक आकलन’ या विषयावर चौथ्या सत्रात प्रसेनजीत फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिसंवादात, काशिनाथ पवार, डॉ. विनायक लष्कर, गौरी डोखळे, अरुणा साबळे यांनी सहभाग घेतला. त्रिंबक नारायण आत्रे यांच्या ’गावगाडा’ या ग्रंथाच्या पुढील संशोधन डॉ. प्रभाकर मांडे यांनी ’गावगाड्याबाहेर’ या ग्रंथात शब्दांकित केले आहे. गावगाड्याची पांढरी, अन् गावगाड्याबाहेरील काळी संस्कृती त्यांनी मांडली आहे, यावरही सहभागींनी भाष्य केले. “गावगाड्याबाहेर’ हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ म्हणजे ग्रामजीवनातील गीता आहे,” असे मत प्रसेनजीत फडणवीस यांनी व्यक्त केले. दरम्यान ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’मधील विद्यार्थिनींनी ’विंचू चावला...’ हे एकनाथी भारुड सादर केले. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या वारस मानसी चापेकर यांचा कुटुंबीयांसमवेत सत्कार करण्यात आला.
 
पाचव्या सत्रात डॉ. श्यामा घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली ’डॉ. प्रभाकर मांडे यांची लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोकमानस संकल्पना’ या परिसंवादात, डॉ. सुभाष आहेर, रूपाली भुसारी, सुनंदा भगत यांनी डॉ. मांडे यांनी या संदर्भात लिहिलेल्या विविध ग्रंथांवर भाष्य करताना, मांडे यांचा प्रत्येक ग्रंथ म्हणजे जणू काही विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) या पदवीचा प्रबंध आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख केला. दरम्यान, सुप्रसिद्ध नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांना सन्मानित करण्यात आले.
 
सहाव्या सत्रात डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा वेध प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यासाठी मांडे यांचे तरुण काळातील प्राध्यापक स्नेही अन् कालांतराने झालेले व्याही, प्रा. प्रभाकर देव तसेच मांडे यांची स्नुषा अन् शिष्या वृषाली मांडे यांच्याशी, गिरीश प्रभुणे आणि रवींद्र गोळे यांनी सुसंवाद साधला. पूर्वग्रह न बाळगता केलेले अफाट वाचन, दांडगा जनसंपर्क, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा साक्षेपी धांडोळा घेणारा संशोधक, सुमारे ५२ ग्रंथांचे लेखन करणारा सिद्धहस्त साहित्यिक, कुटुंबातील प्रेमळ कर्ता पुरुष आणि सहृदयी जगन्मित्र असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू श्रोत्यांसमोर उलगडत गेले. सातव्या सत्रात सोमनाथपूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथील ‘श्री जगदंब’ कलापथकातील शाहीर रतिकांत घोगरे, शाहीर लक्ष्मण बनसोडे, शाहीर सत्यवान मदने, शाहीर विशाल घोडके यांनी आपल्या शाहिरी कवनांच्या माध्यमातून डॉ. प्रभाकर मांडे यांना अभिवादन केले. संजय पाचंगे (संबळ) आणि ओंकार शिंदे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी आठव्या सत्रात ’डॉ. प्रभाकर मांडे यांची लोककला व अभिजात रंगभूमीविषयक भूमिका’ या परिसंवादात, डॉ. विक्रम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पूनम देशमुख, अश्विनी ठाकूर, सतीश अवचार, ममता सोनवणे यांनी सहभाग घेतला. ’भारतीय संस्कृती आणि डॉ. प्रभाकर मांडे यांचे साहित्यलेखन’ या नवव्या सत्रातील परिसंवादात ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’चे उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली, अनिता साबळे, वैशाली धोंडे, सपना ठाकर, सारिका देसाई यांनी डॉ. मांडे लिखित ’उपेक्षित’, ’भाकिते’, ’लोकसंस्कृती आणि इतिहास’ या ग्रंथांवर भाष्य केले.
 
दहाव्या सत्रात ’भारतीय शिक्षण परंपरा आणि डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन’ या प्रा. डॉ. वामनराव गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिसंवादात, गिरीश प्रभुणे, महेश दाबक, प्रा. डॉ. श्याम अत्रे, मधुरा डांगे यांनी शिक्षण परंपराविषयक भाष्य केले. प्रा. डॉ. वामनराव गोगटे यांनी अध्यक्षीय प्रतिपादनातून ’आपली देशी परंपरा पुनरुज्जीवित करावी लागेल!’ या डॉ. मांडे यांच्या मताचा पुनरुच्चार केला. अकराव्या सत्रात डॉ. सुनील भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रवींद्र नामदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव काळे, शुभांगी तांबट, डॉ. उज्ज्वला हातागळे, मारुती वाघमारे, कौशल्या गायकवाड, झुंबर मेंगडे यांनी सहभाग घेतला. डॉ. मांडे लिखित ’लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन’, ’मांग आणि मागते’, ’लोकमानस रंग आणि ढंग’ या ग्रंथांवर सहभागींकडून ऊहापोह करण्यात आला. डॉ. सुनील भंडगे यांनी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. मांडे यांचा ’ज्ञानऋषी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. संजय तांबट यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.
 
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी उपासक आणि साक्षेपी संशोधक ‘पद्मश्री’ डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करण्यासाठी, आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप ज्येष्ठ विचारवंत ‘पद्मश्री’ रमेश पतंगे, ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ अध्यक्ष ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतिश गोरडे, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे प्रभारी कुलसचिव डॉ. अविनाश कुंभार, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, प्रांतमंत्री किशोर चव्हाण यांच्या व्यासपीठावरील तसेच सभागृहातील मांडे कुटुंबीयांसह, विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने संपन्न झाला. यावेळी समारोपपर भूमिका मांडताना रमेश पतंगे म्हणाले की, “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, अशी ठाम भूमिका घेऊन ‘पद्मश्री’ डॉ. प्रभाकर मांडे यांनी दीर्घकाळ सांस्कृतिक कार्य केल्याने, त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य आहे. डॉ. प्रभाकर मांडे यांचे ग्रंथ विचारांना अन् जीवनाला दिशा देणारे होते,याची अनुभूती मी स्वतः घेतली आहे. ‘सकल हिंदू समाज’ हा सर्व गुणदोषांसकट आपला आहे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. डॉ. मांडे यांच्या साहित्यातून गावकुसाबाहेरील समाजाचे दर्शन घडते. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा आढावा घेताना महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण होते. त्यामुळे लोकसंस्कृतीच्या संशोधकांनी निर्भय होऊन मांडे यांच्यासारखी सरस्वतीसाधना केली पाहिजे!” गिरीश प्रभुणे यांनी डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक - सांस्कृतिक योगदानाची माहिती आताच्या नवीन पिढीला व्हावी, या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चे पूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
संयोजनात डॉ. अशोक नगरकर, रवींद्र नामदे, नितीन बारणे, सुहास पोफळे, पूनम गुजर, अतुल आडे, समर्थ डोंगरे, प्रदीप गांधलीकर यांच्यासह ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित वेगवेगळ्या शाळा आणि गुरुकुलम्मधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केले. सामुदायिक पसायदानाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.
 
 
 
(लेखक क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवडचे कार्यवाह आहेत.)
9822197186

सतीश गोरडे