मुंबई, दि.८ : प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मंगळवार दि.८ रोजी २०३० सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली. ज्यासाठी १ लाख १३ हजार ८११ अर्ज प्राप्त झाले होते. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घर मिळण्याची प्रक्रिया आणि जिंकल्यास आनंदाची अनुभूती घेण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील अर्जदार नागरिक या कार्यक्रमाला हजर होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांच्यासह म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, जुहू, पवई, विक्रोळी, ताडदेव, दादर, वरळी, वडाळा आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून सोडत पूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. या कालावधीत मुंबई मंडळाकडे अनामत रकमेसह एक लाख १३ हजार अर्ज सादर झाले आहेत.
"यंदाच्या वर्षी लाखो अर्ज प्राप्त झाले. यातून हे सिद्ध होते की म्हाडाची घर ही खऱ्या अर्थाने परवडणारी घरे आहेत. मोठ्याप्रमाणावर या घरांना मागणी आहे. मागील दीड वर्षात आम्ही पूर्ण महाराष्ट्रात मुंबई बोर्डच्या २ लॉटरी, पुणे बोर्डच्या २ लॉटरी, कोकण बोर्डच्या २ लॉटरी यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा एकूण म्हाडाने ९ सोडती जाहीर केल्या. याअंतर्गत ३० हजार घरांचे वाटप केले आहे. उद्या कोकण बोर्डची १२ हजार घरांची, पुणे बोर्डाच्या ४ हजार घरांची सोडत येत्या २ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.मुंबईत मार्च किंवा जून मध्ये २०२५ला पुन्हा एकदा मुंबई मंडळाची सोडत जाहीर करण्यात येईल," अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
यावेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले, मुंबईकरांचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर मिळावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू करण्यात आली. आज २०३० घरांसाठी १ लाख १३ हजारांहून अधिक अर्ज आले. मुंबई शहर आणि आजूबाजूचा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादाच्या नेतृत्वात मुंबईचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. धारावी, बीडीडी चाळच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून हा विकास केला जात आहे.
---------
मी गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करत होते. मी म्हाडामध्येच काम करते. कामानिमित्त मी दररोज टिटवाळा ते वांद्रे असा प्रवास करत होते. यावेळी सोडतीत मी २६ अर्ज केले होते. त्यापैकी आज आम्हाला १ फ्लॅट मिळाला आहे, जो विक्रोळीत आहे.
-जयश्री कोतकर
मी २००७मध्ये सेवानिवृत्त झालो, अनेक वर्षांपासून फॉर्म भरत होतो. पण आज तो दिवस आला आहे जेव्हा मला माझ्या स्वप्नातील घर मिळाले आहे. आयुष्यभराची पुंजी आता मी या घरासाठी लावणार आहे. सद्यस्थितीत चुनाभट्टी येथे मी चाळीत राहतो.
- प्रमोद गायकवाड, एक्स सर्व्हिसमन
मी २००६पासून सतत फॉर्म भरत आहे. पण मला अजून घर मिळालेले नाही. पुढच्या वेळी मला माझे हक्काचे घर नक्की मिळेल अशी आशा आहे.
- पंढरीनाथ पवार