अयोध्येत पर्यावरणपूरक हरित भक्तनिवास; मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन
08-Oct-2024
Total Views |
डोंबिवली : राज्यातील महायुती सरकारने अयोध्येत नवा अध्याय लिहिला आहे. महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्तनिवास बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मंदिर परिसरात सरकारने जूनमध्ये जमीन घेतली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ०८ ऑक्टोबर रोजी अयोध्येत या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आ. वेदप्रकाश गुप्ता, माजी आ. गोरखनाथ बाबा, महापौर गिरीशपती त्रिपाठी, भाजप अयोध्या जिल्हाध्यक्ष संजीव सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी हेदेखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, “श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदीतटाची आठवण झाली. त्यातूनच महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाते जपले गेले. अयोध्येतील भक्तनिवास म्हणजे याच भावनिक नात्याचे पुढचे पाऊल आहे,” असे त्यांनी सांगितले.
भाविकांमध्ये आनंद
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जानेवारीत संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाविकाच्या अयोध्या वारीची मोठी संख्या लक्षात घेऊन जूनमध्ये भक्तनिवास बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
असा असेल भक्तनिवास
जवळपास ९ हजार ५०० चौ.मी. क्षेत्रफळावर १२ मजली भव्य भक्तनिवासाची पर्यावरणपूरक हरित इमारत बांधण्यात येणार आहे. हे भक्तनिवास अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळापासून ११.५ किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून ७.५ किमी, तर अयोध्या रेल्वे जंक्शन ४.५ किमीवर आहे. या भक्तनिवासात ६५० पर्यटक राहू शकतील. भक्तनिवासात एकूण चार व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या असून ४० डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत ही पर्यावरणपूरक हरित इमारत बांधून पूर्ण करण्यात येणार आहे.