मुंबई : (Mith Chowky Junction) मालाड (पश्चिम) मीठ चौकी जोड मार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका रविवार, दि. ६ ऑक्टोबरपासून खुली होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या मार्गिकेचे लोकार्पण होईल.
मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मीठ चौकी जंक्शनवर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून पालिकेने ‘टी’ आकाराचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी रविवारी खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेची लांबी ३९० मीटर असून रूंदी ८ मीटर आहे. तर, मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी उड्डाणपुलाची मार्गिका डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत खुली करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने, दुसऱ्या मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने पूर्णत्वाकडे नेण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे मालवणी टाऊनशिप महापालिका शालेय इमारतीचे लोकार्पण यावेळी होणार आहे. या स्थापना सन १९६६ मध्ये झाली. पूर्वी या इमारतीचे स्वरूप तळमजला अधिक एक मजला असे होते. ही शालेय इमारत सन २०२० मध्ये निष्कासित करण्यात आली. त्यानंतर तळमजला आणि सहा मजले अशा स्वरूपात या शालेय इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.