YRF Spy Universe : शर्वरी वाघ आणि आलिया भट्टच्या ‘अल्फा’ची रिलीज डेट ठरली

    05-Oct-2024
Total Views |

alpha  
 
मुंबई : यशराज फिल्म्सच्या बहुचर्चित ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये आता महिला प्रधान चित्रपटाला लवकरच समावेश होणार आहे. ‘अल्फा’ असे या नव्या चित्रपटाचे नाव असून यामध्ये पहिल्यांदाच दोन महिला स्पाय एजंट्सची प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यात एकत्र दिसणार असून या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. तसेच, चित्रपट प्रदर्शित कधी होणार याची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे.
 
‘अल्फा’ हा यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला स्त्री-प्रधान चित्रपट आहे. यापूर्वी ‘टायगर’, ‘पठाण’ आणि ‘वॉर’ सारख्या चित्रपट मालिकांच्या यशानंतर ‘अल्फा’मध्ये स्त्री पात्रांचा प्रमुख सहभाग असणार आहे. यशराज फिल्म्सने नुकतीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. “२०२५ च्या ख्रिसमसला अल्फा प्रेक्षकांच्या भेटीला येणार! एक थरारक आणि अ‍ॅक्शनने भरलेला सण अनुभवण्यासाठी सज्ज व्हा… २५ डिसेंबर २०२५”, अशी पोस्ट करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ‘अल्फा’ चं चित्रीकरण जुलै २०२४ पासून सुरू झालं असून आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी त्यांच्या भूमिकांसाठी प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच, यात अनिल कपूर आणि बॉबी देओलही काम करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन शिव राविल करत आहेत.