धर्मांध मोहम्मद युनूस सरकारची दुर्गापूजेवर बंदी

बांगलादेशात दुर्गापूजेसाठी द्यावा लागणार जिझिया

    04-Oct-2024
Total Views |

durgapuja
 
मुंबई, दि. 3 : (Bangladesh) बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारने पारंपरिक दुर्गापूजेवर बंदी घातली असून, ज्या मंडळांना परवानगी मिळाली आहे, त्यांना जिझिया करही द्यावा लागणार आहे. बांगलादेशातील बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे बांगलादेश सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.
 
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंची अवस्था दयनीय झाली असून, बांगलादेशातील हिंदूंना कोणी वाली उरलेला नाही. सातत्याने होणारी आक्रमणे, शोषण आणि राजकीय अन्याय याचा सामना बांगलादेशातील हिंदूंना करावा लागत आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, बांगलादेशातही भारताप्रमाणेच मोठ्या प्रमाणात दुर्गापूजा साजरी केली जाते. मात्र, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील काळजीवाहू सरकारने या दुर्गापूजेवरच बंदी आणली असून धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत, हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची पायामल्ली करण्यास सुरुवात केली आहे.
 
यापूर्वीदेखील बांगलादेशात अनेक ठिकाणी दुर्गापूजेच्या मिरवणुकीवर, देवीच्या मूर्तींवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे अशा ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मुस्लीमबहुल राष्ट्र असल्याने, बांगलादेशामध्ये दुर्गापूजेची परवानगी देऊ नये, यासाठी गेले काही दिवस बांगलादेशात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. तसेच, दुर्गापूजेला मोठ्या प्रमाणात विरोधदेखील बांगलादेशात होत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी दगड मारून दुर्गामातेची मूर्ती भंग करण्याचे विध्वंसक प्रकार घडले आहेत. किशोरी जंग येथील बत्रिश गोपीनाथ जीउर आखाडा इथेही असाच प्रकार घडला आहे. तर कोमिला जिल्ह्यामध्येदेखील दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. तसेच, अनेक मंदिरातील दानपेटी ही चोरून देण्यात समाजकंटकांना यश आले आहे. बांगलादेशात दुर्गापूजा ही परंपरागत असून, शेख हसीना पंतप्रधान असताना ही परंपरा व्यवस्थित जोपासली जात होती. मात्र, मोहम्मद युनूस यांच्या काळजीवाहू सरकारने धार्मिक तणावाचे कारण देत, ही परंपरा खंडित केली आहे. दुर्गापूजेची परवानगी मंडळांना दिलेली नसून, ज्या मंडळांना ती मिळाली आहे, त्यांच्यावरती असंख्य जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या मंडळांना नमाजपठण सुरू असताना शांतता बाळगण्याची अटही घालण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशात जेव्हाही नमाजपठण सुरू असेल, तेव्हा कोणत्याही परवानगी मिळालेल्या मंडळाला देवीची पूजा आरती, भजन करता येणार नाही. तसेच, दि. 9 ऑक्टोबर रोजीपासून सुरू होणार्‍या दुर्गापूजा उत्सवाच्या आधी परवानगीधारक मंडळांना पाच लाख रुपयांचा जिझिया देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक उत्सव समित्यांनी यावर्षी दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारतातील दुर्गापूजेवरही विघ्न आणण्याचा होता डाव
 
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. धार्मिक कारणांमुळे हिल्सा जातीच्या माशांची या काळात मागणी वाढते. या माशाचे उत्पादन बांगलादेशमध्ये जास्त प्रमाणात होत असून, शेख हसीना यांच्या काळापासून बांगलादेश नवरात्र उत्सव काळात या माशांची निर्यात भारताला करत असतो. ही निर्यात थांबवण्याचा निर्णय मोहम्मद युनूस यांच्या सरकारने घेतला होता. त्यामुळे या माशाचे दर वाढण्याच्या भीतीने काही काळ पश्चिम बंगालमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भारत सरकारच्या मध्यस्थीने बांगलादेश सरकारने आपला निर्णय मागे घेत हिल्सा माशाची निर्यात भारताला केली आहे.