मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर भाजपने आंदोलन सुरु केलं आहे. चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या अमोल लोडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
"चंद्रपूरमध्ये युवा काँग्रसेच्या शहराध्यक्षाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. विजय वडेट्टीवार इतर वेळी आव आणून बोलतात. परंतू, या प्रकरणावर ते काहीही बोलायला तयार नाहीत. हीच काँग्रेसची संस्कृती आहे का? कुठलीही घटना घडल्यावर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे बोलत असतात. आज त्यांची भूमिका काय आहे?" असा सवाल या आंदोलकांकडून करण्यात आला आहे. तसेच विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजप युवा मोर्चाने जोरदार आंदोलन सुरु केलं आहे.