इस्रायलवर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा निषेध करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल इस्रायलने नुकतीच संयुक्त राष्ट्राचे प्रमुख, सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना इस्रायलमध्ये प्रवेशासाठी चक्क बंदी घोषित केली आहे. याबाबत बोलताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी जाहीर केले की, “इस्रायलने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना ‘नॉन ग्राटा व्यक्ती’ घोषित केले असून, त्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.”
खरं तर पश्चिम आशियातील युद्धाबाबत प्रारंभीपासूनच गुटेरस यांची भूमिका ही काहीशी मानवाधिकार आणि सहानुभूतीच्या पारड्याकडे अधिक झुकलेली दिसते. त्यातच इराणने इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर प. आशियात सुरू असलेल्या तणावाचा गुटेरस यांनी निषेध केला. परंतु, त्यामध्ये त्यांनी इराण किंवा इस्रायलचे नाव घेण्याचे मात्र टाळले. ते म्हणाले की, “मी मध्य-पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा निषेध करतो. हे सगळे आता थांबले पाहिजे. आम्हाला पूर्णपणे युद्धविरामाची गरज आहे,” असे त्यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
गुटेरस यांनी लेबेनॉनमधील संघर्षाबद्दलदेखील तीव्र चिंता व्यक्त केली होती आणि इस्रायलला लेबेनॉनच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहनही केले होते. गुटेरस म्हणाले होते की, “मी लेबेनॉनमधील संघर्षाच्या वाढीबद्दल अत्यंत चिंतीत आहे आणि त्वरित युद्धविराम करण्याचे आवाहन करतो. लेबेनॉनमध्ये सर्वतोपरी युद्ध टाळले पाहिजे आणि लेबेनॉनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे.”
लेबेनॉनपूर्वी गुटेरस यांनी अशीच गाझामधील गंभीर परिस्थितीबद्दलदेखील वारंवार चिंता व्यक्त केली होती. गुटेरस म्हणाले होते की, “गाझामध्ये आपण ज्या दुःखांची पातळी पाहात आहोत, ती संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस म्हणून चिंता दर्शविणारी आहे. गेल्या काही महिन्यांत गाझामध्ये गाठली गेलेली मृत्यू आणि विनाशाची पातळी मी कधीच पाहिली नाही.” अशाप्रकारे गुटेरस यांच्या भूमिका आणि एकूणच वक्तव्ये आजवर काहीशी बोटचेपी राहिलेली दिसतात. त्यांनी दहशतवादाचा तोंडदेखला विरोध जरुर नोंदवला असला, तरी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणून गुटेरस हे अपयशी ठरल्याचेच म्हणता येईल.
यानिमित्ताने गुटेरस यांचा अल्पपरिचय करुन देणे अगत्याचे ठरावे. अँटोनियो गुटेरस यांनी दि. 1 जानेवारी 2017 रोजी संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यभार स्वीकारला. 1949 मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या गुटेरस यांचे अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण झाले असून, इंग्रजीसह पोर्तुगीज, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. गुटेरस हे विवाहित असून, त्यांना दोन मुले आणि तीन नातवंडेदेखील आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस होण्यापूर्वी, त्यांनी जून 2005 ते डिसेंबर 2015 या कालावधीत निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त म्हणूनदेखील काम केले.
एवढेच नाही, तर गुटेरस 1995 ते 2002 सालापर्यंत पोर्तुगालचे पंतप्रधानदेखील होते. त्यांनी 2000च्या दशकाच्या प्रारंभी युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिले आहे. म्हणजे एकूणच काय, गुटेरस यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. केवळ पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणूनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रश्नांची त्यांना उत्तम समजही आहे. पण, गुटेरस हे अनुभवदृष्ट्या संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणून जरी योग्य उमेदवार असले तरी त्यांच्या कारकिर्दीत जगामध्ये संघर्षांचे, युद्धाचे प्रमाणही वाढलेले दिसते. 2017 पासून ते 2024 पर्यंत केवळ प. आशियातच नाही, तर अख्ख्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. यामध्ये ‘कोविड’ महामारीचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.
‘कोविड’ काळातही जग संकटाच्या आणि नंतर स्थित्यंतराच्या मोठ्या प्रक्रियेतून गेले. त्यावेळीही संयुक्त राष्ट्रे एकूणच या महामारीविषयक उपाययोजना करण्यात आणि जागतिक मृत्युदर रोखण्यात अपयशी ठरली. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनविषयीदेखील गुटेरस यांची भूमिका ही सौम्य आणि काहीशी ढिम्म राहिली. चीनपुढे गुटेरस यांनी सपशेल लोटांगण घातल्याची टीका त्यावेळीदेखील झाली होती. त्यानंतरही अझरबैजान-आर्मेनिया संघर्ष, अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार आणि तालिबानचे अत्याचार, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता पेटलेले प. आशिया अशा महत्त्वाच्या जागतिक घडामोडींवर सामोपचाराने तोडगा काढण्यात, संतुलित भूमिका घेण्यात संयुक्त राष्ट्र संघटना आणि गुटेरस अपयशी ठरले आहेत!