इस्रायल-इराण संघर्ष; तेलाच्या किमतींसह बाजारातील गुंतवणूक, तज्ज्ञांचा अंदाज काय

    03-Oct-2024
Total Views |
iran israel conflict oil prices hiked


मुंबई :   इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावानंतर जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होणार असून इराणच्या हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तेल विपणन, पेंट्स, एव्हिएशन आणि टायर यासारख्या प्रमुख तेल संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.


दरम्यान, जगातील सर्वात मोठे तेल उत्पादक देश युध्दाच्या सावटाखाली सापडले असून त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर दिसून येतो आहे. जगातील ५ टक्के क्रुड ऑईल उत्पादन इराण देश करतो. त्यामुळे इस्त्रायलसोबतच्या तणावानंतर तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, भारतीय शेअर बाजारावर याचा परिणाम झाला असून सेन्सेक्स १७६९ अंकांनी कोसळला.

विशेष म्हणजे तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ने तेल उत्पादन धोरणात कुठलाही बदल केला नसला तरीही इराण-इस्रायल संघर्षाचा व्यापारावर परिणाम होईल. रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणे मध्यपूर्वेतील युद्ध स्थानिक पातळीवर मर्यादित असू शकते. इक्विटी मार्केट नजीकच्या काळात अस्थिर राहू शकतात आणि इस्रायलची प्रतिक्रिया स्पष्ट होण्यापूर्वी शेअर्स आणखी १ ते ३ टक्क्यांनी घसरतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.