देशात लक्झरी घरांच्या विक्रीत वाढ; परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांची पाठ?, काय सांगतो अहवाल

    03-Oct-2024
Total Views |
home-sale-luxury-houses-sold-in-third-quarter-increased


मुंबई :      देशात लक्झरी घरांच्या विक्रीत वाढ दिसून आली आहे. महागड्या घरांच्या विक्रीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ होत असून १ कोटी किंवा त्याहून जास्त किमतीच्या घरांचा वाटा एकूण विक्रीच्या निम्मा आहे. परिणामी, देशात महागड्या घरांचा हिस्सा(किंमत एक कोटी आणि त्याहून अधिक) वेगाने वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत, एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची घरे इतक्या मोठ्या प्रमाणात विकली गेली आहेत की आता एकूण विक्रीत त्यांचा वाटा निम्मा आहे. दुसरीकडे, परवडणाऱ्या आणि मध्यम श्रेणीतील घरांच्या विक्रीत घट झाली आहे. घरांच्या एकूण विक्रीत वाढ झाल्याने त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. नवीन घरे विकत घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

दरम्यान, देशात लक्झरी घरांची तिसऱ्या तिमाहीत चांगली विक्री झाली असून एकूण विक्रीतील हिस्सा ४६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, महागड्या घरांच्या जास्त विक्रीमुळे परवडणाऱ्या आणि मध्यम विभागातील घरांच्या विक्रीत घट नोंदविली आहे. एकीकडे महागड्या(लक्झरी) घरांना वाढता प्रतिसाद असताना दुसरीकडे, परवडणाऱ्या आणि मध्यम किमतीच्या घरांची विक्री कमी झाल्याचे दिसून आले आहे.


परवडणाऱ्या घरांकडे पाठ?

महागड्या घरांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत असताना परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाच्या या अहवालानुसार २०२४ च्या जुलै-सप्टेंबर या कालावधीत परवडणाऱ्या घरांची म्हणजेच ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री १४ टक्क्यांनी घसरून २०,७६९ वर आली आहे. या कालावधीत मध्यम दरातील घरांची म्हणजेच ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांची विक्री १३ टक्क्यांनी घसरून २६,०११ वर आली आहे.