राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील आजवरचे सर्वाधिक खोटे बोलणारे नेते ठरावेत. त्यांच्या काँग्रेस पक्षाचे नेतेही म्हणूनच राहुल यांच्या विधानाचे समर्थन करताना दिसून येत नाहीत. ‘संविधान खतरे में’ असे म्हणत, ज्या काँग्रेसने लोकसभेत काही जास्तीच्या जागा पदरात पाडून घेतल्या, तीच काँग्रेस आता विधानसभा निमित्ताने पुन्हा एकदा तीच बोंब मारत आहे.
देशाच्या राजकारणातील आजवरचा सर्वाधिक खोटे बोलणारा नेता, अशी नोंद विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नावावर व्हायला आणि आम्हाला वाटते त्यासाठी त्यांचीही म्हणा काहीच हरकत नसावी. अशा या राहुल गांधी यांचा भाजपद्वेष विशेषतः मोदीद्वेष भारताच्या जनतेला नवा नाही. त्याचबरोबर, राहुल हे किती विद्वान आहेत, हे काँग्रेसी जनांनाही नेमकेपणाने माहीत आहे. म्हणूनच, राहुल जेव्हा एखादे वक्तव्य करतात, तेव्हा त्याचे समर्थन करण्यास इतरवेळी गांधी घराण्याची हुजुरेगिरी करण्यात धन्यता मानणारे काँग्रेसी नेते, अशावेळी स्वतःला त्यापासून दूर ठेवतात. अगदी मुंबईतील उद्धव ठाकरे-संजय राऊत हे नव्याने बाटलेलेही त्याला अपवाद नाहीत. भाजप पुन्हा सत्तेवर आला, तर तो देशाचे संविधान बदलणार, असा अपप्रचार तर हेतूतः राहुल करत आहेतच. त्याशिवाय, अदानी-अंबानी समूहाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किती सलगी आहे, हे सांगणारे त्यांचे विधान असो वा ‘अग्निवीर’ या लष्कराच्या योजनेबद्दलचा अपप्रचार असो. राहुल नेटाने खोटे बोलत राहतात, विदेशात जाऊनही देशाविरोधात अपप्रचार करतात. त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका वारीतही त्यांनी यापेक्षा वेगळे काही केलेले नाही. आता त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधत, पुन्हा एकदा केंद्रातील सरकारविरोधात उलट्या बोंबा मारल्या आहेत. त्याशिवाय ‘अग्निवीर’ योजनेबद्दलही पुन्हा एकदा नव्याने खोटे बोलले आहेत.
उद्योगपती अंबानी यांच्या चिरंजीवांचा विवाहसोहळा नुकताच अतिशय थाटामाटात झाला. देशविदेशांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यात काँग्रेसी नेत्यांचाही समावेश होता, हे लक्षात घ्यायला हवे. अंबानी समूहाला साजेसाच थाटमाट या सोहळ्याचा अर्थातच होता. असे असतानाही, पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे लुटून त्यातून हा सोहळा साजरा केला गेला, असे अत्यंत चुकीचे वक्तव्य राहुल यांनी केले. देशातील शेतकरी कर्ज काढल्याशिवाय विवाह सोहळा करू शकत नाही. मात्र, मोदींचे मित्र असलेले अंबानी त्यासाठी कोट्यवधी रुपये कसे खर्च करू शकतात, हा त्यांचा प्रश्न. त्यांच्या बालिश बुद्धीला साजेलसा, असेही आता म्हणता येत नाही. त्यांनी वयाची पन्नाशी पार केलेली असल्यामुळे तसे म्हणणे औचित्यपूर्ण ठरणार नाही. अंबानी यांच्या सोहळ्याचा आणि संविधानाचा बादरीनारायण संबंध लावायला ते अर्थातच विसरलेले नाहीत. पुन्हा एकदा ‘संविधान खतरे में’ अशी बांग त्यांनी ठोकली आहे. पंतप्रधान मोदी अंबानी आणि अदानी यांना जेवढे पैसे देतात, तेवढेच त्यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला द्यायला हवे, अशीही त्यांची मागणी. भारतात रोजगाराचे प्रमाण वाढले असून, वेतनातही वाढ झाली असल्याचे नवनवीन अहवालातून समोर येत असताना, रोजगाराच्या संधी बंद झाल्या आहेत, असे निखालस खोटे त्यांनी पुन्हा एकदा बोलले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’ बंद करायला निघालेल्या काँग्रेसने, हरियाणात मात्र महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
राहुल हे आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. ते जे म्हणतात, त्याला देशातील 28 विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे, असेही म्हणता येईल. तर असे हे ‘इंडी’ आघाडीचे लोकसभेतील 28 विरोधी पक्षांचे नेते पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल करत आहेत. सैन्यदलासाठी प्रशिक्षित जवान देणारी ‘अग्निवीर’ ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अशीच आहे. युवकांना स्वावलंबनाचे धडे तर ती देतेच, त्याशिवाय त्यांना संरक्षणदलात सेवेची संधीही ती मिळवून देते. ही योजना सादर केली गेली, तेव्हाच यात होणारी भरती ही चार वर्षांसाठी असून, त्यानंतर युवकांच्या कौशल्यावर त्यांना संरक्षणदलात प्रवेश मिळेल, हे स्पष्ट करण्यात आले होते. हरियाणाचा आणि संरक्षणदलाचा प्रदीर्घ कालावधीपासून विशेष संबंध असल्याने, तेथील विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे, असे म्हणता येईल. ‘संविधान बदलणार, संविधान धोक्यात आहे,’ असा अपप्रचार लोकसभा निवडणुकीवेळी करून झाला. त्यानंतर, मोदी सरकार 3.0 सत्तेत आले, त्यालाही 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. संविधान बदलण्याचे कोणतेही संकेत त्यातून मिळत नसल्याने, अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा ही बोंब ठोकली आहे.
‘अग्निपथ योजने’तील तरुणांना चार वर्षांनंतर अंदाजे 12 लाख रुपये करमुक्त इतकी रक्कम मिळते. त्याशिवाय, त्यातील 25 टक्के अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर नियमित सैन्य सेवेत सामावून घेतले जाते. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि गोवा यांसारख्या राज्यांनी अग्निवीरांसाठी सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षण जाहीर केले आहे. जुलै महिन्यात हुतात्मा अग्निवीराला नुकसान भरपाई मिळत नसल्याचा धडधडीत खोटा आरोप राहुल यांनी संसदेत बोलताना केला होता. तसेच, त्यांनी देशाच्या हिताशी तडजोड करत, संरक्षणदलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ही काँग्रेसची परंपराच आहे. काँग्रेसी शस्त्रास्त्र दलालांना बाजूला करत भारताने फ्रान्सबरोबर थेट व्यवहार करत ‘राफेल’ विमानांची खरेदी केली. त्यावेळी ‘राफेल’च्या किमतीवर याच काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चीनने भारतीय भूभाग गिळंकृत केला, असे खोटे सांगणारी काँग्रेसच आहे. भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकपुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत, सर्जिकल स्ट्राईक, एरियल स्ट्राईक केले. मात्र, त्यांचे पुरावे मागण्याचे पाप राहुल यांनीच केले होते.
विधानसभेच्या निमित्ताने, ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा निर्लज्ज प्रयत्न काँग्रेस करत आहे. खोटे बोलून, काँग्रेसला विधानसभेत यश मिळवायचे आहे. त्यासाठीच कृषी, बेरोजगारी, ‘अग्निवीर’ भरती हे संवेदनशील विषय ऐरणीवर आणले जात आहेत. काँग्रेसला ‘वन रँक, वन पेन्शन’सारखा विषय हाताळायला वेळ मिळाला नव्हता. मात्र, तो विषयही केंद्र सरकारने यशस्वीपणे मार्गी लावला. अदानी-अंबानी उद्योगसमूह जे मोठे झाले, ते त्यांच्या कौशल्याच्या जोरावर. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या कार्यकाळातच त्यांची सुरुवात झाली, प्रगती झाली. असे असतानाही, आज काँग्रेस सामान्यांची दिशाभूल करत, केंद्र सरकार या उद्योगांना झुकते माप देते, असा अपप्रचार चालवला आहे. या उद्योगांनी त्यांच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत, म्हणूनच आज जगभरात त्यांचा लौकिक झाला आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा भारतात अंबानी समूहामुळेच मिळत आहे, हे नाकारता येणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही राहुल यांनी केलेली विधाने म्हणजे खोटारड्याच्या उलट्या बोंबाच होत.