मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉसचे देशभरातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून तो ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यावेळीस हा सीझन केवळ ७० दिवसांत प्रेक्षकांना निरोप घेणार आहे. कारण, ६ ऑक्टोबरलाच हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन सुरु होणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमधील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले असले तरी अजूनही काही नावांती चर्चा सुरू आहे. अशातच आता एक नाव समोर आलं आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस १८'मध्ये दिसणार आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री होणार आहे. 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं सांगितलं आहे. सदावर्ते म्हणाले, "मी सदावर्ते आहे. आगे आगे देखो होता है क्या...हमारा नामही काफी है. हम डंके की चोट पर बोलते है. मला लोक घाबरतात. त्यामुळे माझ्यासमोर घरात लढाईच होणार नाही". या शोची ऑफर मिळण्याबाबत ते म्हणाले की चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतात.
गुणरत्न सदावर्ते हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ते प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच, याही अठराव्या हिंदी सीझनमध्ये घरात एक मराठमोळा चेहरा दिसणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक असून'बिग बॉस १८' चा ग्रँड प्रिमियर ६ ऑक्टोबरला संपन्न होणार आहे.