अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात ५०० वर्षांनी होणार दीपोत्सव
यंदाच्या वर्षी दीपोत्सवात तेवणार २५ लक्ष दिवे
29-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : ( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात यंदा तब्बल ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्यदिव्य असा दीपोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रीराम मंदिरासह शरयु घाटावर तब्बल २५ लक्ष दिवे लावण्याचे संकल्प हिंदू समाजाने केला आहे.
अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची उभारणी होऊन त्यात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा व्हावी, हे स्वप्न हिंदू समाजाने तब्बल ५०० वर्ष आपल्या उरी बाळगले होते. त्यासाठी तब्बल ५ शतके हिंदू समाजाने लढाही दिला. त्यानंतर अखेर हिंदू समाजाला यश आले आणि अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला. भव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठादेखील झाली आणि हिंदू समाजाने लक्ष्यपूर्तीचा आनंद साजरा केला. त्यानंतर यंदाच्या वर्षी अयोध्येतील दीपोत्सवाच्या आठव्या वर्षी श्रीरामललाच्या भव्य मंदिरातही दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील शरयु घाट, शहरातील विविध मंदिरे आणि मठांमध्येही यंदा दीपोत्सव साजरा होणार आहे.
यंदा तब्बल २५ लाख दिव्यांचा नवा विश्वविक्रम करण्यास हिंदू समाज सज्ज झाला आहे. त्यासाठी शरयू नदीच्या किनाऱ्यावरील सर्व ५५ घाटांवर २८ लाख दिवे लावण्यासाठी ३० हजार स्वयंसेवक तैनात आले होते. स्वयंसेवकांनी अतिशय उत्साहाने सर्व घाटांवर दिव्यांची जय्यत तयारी केली आहे. साकेतपासून चार किमीच्या मिरवणुकीत विविध कलाकारांच्या गटांद्वारे दीपोत्सवाचे उद्घाटन केले जाईल. रामायणाच्या विविध भागांवर आधारित कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लक्ष्मण किला घाट ते नया घाटापर्यंत १०० वेदाचार्य वेदमंत्रांच्या घोषात शरयू आरती करणार आहेत.
दीपोत्सवादरम्यान यजमान उत्तर प्रदेशसह देशातील १६ राज्यांतील कलाकारही रामनगरी अयोध्येत सहभागी होणार आहेत. यामध्ये काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, बिहार, चंदीगड, सिक्कीम, छत्तीसगड येथील कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. योगी सरकार दीपोत्सवासोबतच लोकांना विविध देशांच्या संस्कृतीची ओळख करून देते. यंदाच्या दीपोत्सवातही सहा देशांतील कलाकार रामलीलाचे मंचन करणार आहेत. त्यात थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आणि नेपाळमधील कलाकार सहभागी होणार आहेत. यंदाचा दीपोत्सव केवळ श्रीराम मंदिर आणि शरयु घाटापुरताच मर्यादित नसून त्याची प्रभावळ ८४ कोसांपर्यंत पसरली आहे. अयोध्येसह ८४ कोस परिसरात असलेले २०० हून अधिक मठ, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे उजळून निघणार आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही शरयु घाटावर अभुतपूर्व असा लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी बघण्यास मिळणार आहे.
श्री राम मंदिरात तेवणार विशेष दिवे
पहिली दिवाळी अप्रतिम आणि अविस्मरणीय होण्यासाठी भव्य मंदिरात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या इमारतीला डाग आणि काजळीपासून वाचवण्यासाठी विशेष दिव्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या रोषणाईचा कालावधीही जास्तीत जास्त असणार आहे. संपूर्ण मंदिर परिसराची अनेक विभाग आणि उपविभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पद्धतशीरपणे रोषणाई करणे, स्वच्छतेने सजवणे आणि सर्व प्रवेशद्वार कमानींनी सजवणे ही जबाबदारी बिहार केडरमधील स्वेच्छानिवृत्त पोलिस महानिरिक्षक आशु शुक्ला यांच्याकडे देण्यात आली आहे.