विमानाइतकीच आलिशान वंदे भारत स्लीपर ट्रेन

रात्रीच्या प्रवासात क्रांती घडवून आणण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सज्ज

    26-Oct-2024
Total Views |

vande bharat sleeper


मुंबई, दि.२६ : प्रतिनिधी 
वंदे भारत ट्रेन भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. वंदे भारतच्या यशस्वी लोकार्पणांनंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवास करण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने आकर्षक इंटीरियरसह तयार केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे. इतर स्लीपर ट्रेनपेक्षा नक्कीच अधिक क्लास इंटेरिअरने सजलेली ही अद्ययावत सुसज्ज ट्रेन प्रवाशांना विमानाहून अधिक सुखद प्रवास देण्यासाठी सज्ज झाली आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे महाव्यवस्थापक यू. सुब्बाराव यांनी माध्यम संवादात या ट्रेनची त्याची खासियत सांगितली. नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीत ही ट्रेन ट्रॅकवर धावेल. सुरुवातील १६ डब्यांची ही ट्रेन पूर्णपणे एसी असेल. यामध्ये ८२० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. या ट्रेनचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे त्याचा वेग राजधानीपेक्षा खूप जास्त असेल.


वेग १८० किलोमीटर प्रतितास असेल


सुब्बा राव यांनी सांगितले की, एक ट्रेन बनवण्यासाठी १२० कोटी रुपये खर्च आला. ताशी ९० किमी ते १८० किमी प्रतितास या वेगाने या ट्रेनची दोन महिने चाचणी घेतली जाईल. त्याची सुरक्षा वैशिष्ट्ये देखील तपासली जातील. त्यात इमर्जन्सी ब्रेक यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याचे नियंत्रण अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने ठेवण्यात आले आहे. या सर्व गोष्टींची चाचणी घेतली जाईल. आम्ही १५ नोव्हेंबरपर्यंत चाचणीचे काम पूर्ण करणार आहोत. लखनऊ आरडीएसओ आणि पश्चिम रेल्वेमध्ये ही चाचणी केली जाईल. आम्हाला आशा आहे की, १५ जानेवारीपर्यंत ही ट्रेन नागरिकांच्या सेवेत येईल असा अंदाज आहे.

ट्रेनची वैशिष्ट्ये


वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अनेक आधुनिक सुविधा असतील. सेन्सर सक्रिय इंटरकनेक्टिंग दरवाजे बसविण्यात आले आहेत. टच-फ्री बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि टॉक-बॅक युनिट्स बसवण्यात आले आहेत. फर्स्ट क्लास कूपमध्ये वरच्या बर्थ जाण्यासाठी पायऱ्या असतील. फ्लाइट-स्टाईल अटेंडंट बटणावर सहज प्रवेश करता येईल. रेल्वे अपघातांपासून बचाव करण्यासाठी अँटी कोलिजन सिस्टीम 'कवच' आणि अँटी क्लाइंबिंग तंत्रज्ञानही बसवण्यात आले आहे. यामुळे अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढणार नाहीत. यामुळे जीवितहानीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल.


२० डब्यांची ट्रेनही येणार आहे


भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) आणि आयसीएफ या ट्रेनच्या फिनिशिंगवर काम करत आहेत. यानंतर आणखी ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवल्या जातील. आयसीएफ पुढील २४ महिन्यांत ५० आणखी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याची योजना आखत आहे. सुब्बा राव यांनी असेही सांगितले की, आयसीएफ पार्सल वितरणासाठी एक नवीन ट्रेन विकसित करत आहे, जी एप्रिलपर्यंत तयार होईल. हायड्रोजनवर चालणारा पहिला कोचही पुढील चार महिन्यांत विकसित केला जाईल. येत्या १२ ते १८ महिन्यांत आम्ही २० डब्यांच्या २१ नवीन चेअरकार वंदे भारत ट्रेन आणणार आहोत.