१० एकर शेतीत ३ भाऊ : जागावाटपावरून विजय वडेट्टीवारांचं विधान
25-Oct-2024
Total Views |
मुंबई : १० एकर शेतीत ३ भाऊ असल्याने एका भावाला ४ एकर तर इतर दोन भावांना प्रत्येकी ३ एकर शेती मिळेल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "जिथे जिंकण्याची अधिक शक्यता आहे त्या जागा त्या त्या पक्षाला मेरिटनुसार मिळाल्या आहेत. आमच्यात तिढा वगैरे काहीच नाही. आम्ही आता एकमेकांना विडा दिल्याने तिढ्याचा संबंध नाही. अहेरी मतदारसंघात काही प्रमाणात वाद आहे. पण कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु आहे."
"तिन्ही पक्षामध्ये काहीवेळ नाराजी असेल. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. त्यामुळे १० एकर शेती असेल आणि दोन भाऊ असतील तर प्रत्येकाला ५-५ एकर मिळत होती. परंतू, आता तीन भाऊ असल्याने एखाद्याला ४ एकर आणि दोघांना ३-३ एकर येईल. त्यामुळे मेरिटनुसार, ४ एकरवाला कोण आहे हे लवकरच कळेल. इतर मित्रपक्षांसाठी आम्ही १० एकरातील काही जागा शिल्लक ठेवल्या असून त्यांना उत्तम शेती करता येईल, अशा त्या जागा आहेत," असेही त्यांनी सांगितले.