तिरुवनंतपुरम: प्रियांका गांधी यांचा राजकारणात सक्रिय प्रवेश होत असताना, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मात्र अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे दिसून आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरला जात असताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना मात्र दाराबाहेर ताटकळत उभं ठेवले गेलं. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर यामुळे टिकेची झोड उठली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा या सगळ्यावर प्रतिक्रीया देत म्हणाले "खरगेजींसारख्या ज्येष्ठ संसदपटू आणि दलित नेत्याचा केलेला अपमान बघणे अत्यंत निराशाजनक आहे. भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद असू दे किंवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष पद, या पदावरच्या नेत्यांचा वापर निव्वळ रबर स्टँम्प सारखा करण्यात गांधी घराण्याला काय आनंद मिळतो कुणास ठाऊक" कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले " प्रियांका गांधी आपला अर्ज दाखल करत असताना, तुम्ही कुठे होतात खरगेजी ? तुम्हाला बाहेर ठेवण्यात आले कारण तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही. एका वरिष्ठ दलित नेत्याला आणि पक्षाच्या अध्यक्षाला आज ही वागणूक मिळत असेल तर उद्या वायनाड मधील जनतेचे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी."
अपमानामुळे बाहेर पडलो
काँग्रेसच्या नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांचा असा अपमान केल्याची ही पहिलीच वेळ नव्हे. अजय सिंह यादव हे हरियाणा काँग्रेसमधील मोठं नाव. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पतकरावा लागला. या पराभावानंतर तरी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे यादव यांनी म्हटल्यावर, लगेचच त्यांच्या विरोधात पक्षामध्ये नाराजीचा सूर उमाटला. नव्या नेतृत्वाने त्यांचा अपमान केला आणि पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. पार्टी हाय कमांडने माझा भ्रमनिरास केला असल्याचे वक्तव्यं यादव यांनी केले.