निलेश राणे शिवसेनेत दाखल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
24-Oct-2024
Total Views | 71
सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी बुधवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "निलेश राणे यांनी जिथून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात महायुती अधिक भक्कम झाली असून ज्या कुडाळ शहराने राणे साहेबांना २६ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले ते आता ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कोकणात अनेक उद्योग आणले. दिघी बंदराच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होत आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच कोकणातील प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी मुंबई - सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करत असून त्यांचा डीपीआर आणि टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोकणवासीयांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे, यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. आगामी निवडणुकीत निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर आणि किरण सामंत या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी कोकणवासीयांना केले.