मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी धारावी मुंबईच नव्हे तर राज्यातील विविध लघु उद्योगांचे केंद्र आहे. धारावीच्या या अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक युवक - युवती जगत आहे. अशावेळी अकस्मातपणे एखादी संधी येते आणि या संधीचे सोने होते. याच संघर्षातून पुढे जात धारावीतील पियुष लवंगरे याने डिलिव्हरी बॉयची नोकरी करत असताना आता धारावीमध्ये मोबाईल दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेमुळे हे शक्य झाल्याचे पियुष आवर्जून सांगतो. या कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून पियुषला मोबाईल दुरुस्तीच्या प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि पियुषने संधी न दवडता प्रशिक्षण पूर्ण केले. पियुष सांगतो की, “या कार्यशाळेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खरी दुरुस्ती कशी हाताळायची हे शिकणे होता. इथे मी इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर दुरुस्तीपासून सॉफ्टवेअर समस्यानिवारणापर्यंत प्रत्येक गोष्टीचा सराव करू शकलो. शिवाय, ग्राहक संबंध प्रशिक्षणाने मला लोकांचे व्यवसायिक दृष्टया व्यवस्थापन करण्याचा आत्मविश्वास ही दिला. कार्यशाळेतील शिक्षकांनी मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास दिला. मी बेरोजगार होतो या वस्तुस्थितीने मला स्वतःहून काहीतरी करण्यास प्रवृत्त केले."
पुढे हा तरुण सांगतो, "मी एक धाडसी पाऊल उचलत माझ्या जवळच्या परिसरात एक दुकान भाडेतत्वावर घेतले आणि या ठिकाणी मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय अगदी आनंदाने करत आहे. आता, मी या व्यवसायातून दरमहा सुमारे २५,०००रुपये कमावतो. मला माझे कुटुंब चालविण्यासाठी माझा मोठा हातभार लागतो ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट'' असल्याचे पियुष आवर्जून सांगतो. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे धारावी सोशल मिशनअंतर्गत आयोजित केलेल्या अनेक कौशल्य विकास उपक्रमांपैकी एक मोबाईल रिपेअर टेक्निशियन प्रशिक्षण हा पीयूषसारख्या होतकरू विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य शिकवण्याबरोबरच ग्राहकांशी आत्मविश्वासाने संवाद साधण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.