शेती ही हरितगृह वायूंचे भांडार?

    21-Oct-2024
Total Views |
greenhouse gas emission


पृथ्वीवरील तापमानवाढ ही शेती, त्यासंबंधीची जनावरे, मातीवरील भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया, असेंद्रीय म्हणजेच रासायनिक खतांचा बेसुमार वापर यांवर संबंधित आहे (greenhouse gas emission). यापासून अनेकजण अनभिज्ञ आहेत (greenhouse gas emission). अनेक शेतकर्‍यांना ही गोष्ट सांगितली असता, त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे दिसते (greenhouse gas emission). त्याविषयीच भाष्य करणारा हा लेख...
 
 
 
कार्बन डायऑक्सईड हा आपल्याला सामान्यपणे माहीत असलेला हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅस) आहे. जिथे धूर तिथे हा उपलब्ध किंवा हजर असतोच. हरितगृह परिणाम (ग्रीन हाऊस इफेक्ट) अनेकानेक वर्षे चर्चेतला विषय. यामुळे होणार्‍या तापमानवाढीतला कार्बन डायऑक्सईड वाङ्मू हा ८० टक्के वाटा असणारा गुन्हेगार. पेट्रोल, डिझेल, झाड, लाकूड, गवत, प्लास्टिक, कोळसा अशा काही गोष्टी जाळल्या की त्यातून कार्बन डायऑक्सईड तयार होतोच. तो हवेपेक्षा १.५ टक्के जड असल्याने वातावरणात मिसळल्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ रेंगाळत राहतो. झाडांच्या संख्येनुसार तो शोषला जातो. उरलेला वायू सूर्याची उष्णता किरणांच्या माध्यमातून शोषून घेतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचे तापमान वाढवतो. आता कार्बन डायऑक्सईड हा तापमानवाढीचा मुख्य सूत्रधार असला तरी, याला साथ देणारेपण आणखी काही वायू हे सहअपराधी म्हणून आहेत. यात मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडसह कार्बन मोनॉक्साईडसारखे फ्लोरीन असलेल्या वायूंचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, यात पाण्याच्या वाफेचादेखील सिंहाचा वाटा आहे.
 
कारखान्याचे धूर, इंधन ज्वलनाचे धूर आणि इतर प्रकारचे धूर वगळता, एक मोठा विभाग आहे, जो हरितवायूंचे उत्सर्जन करतो; तो म्हणजे शेतीशी निगडित कामे. शेती आणि शेतीशी निगडित कामे ही मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडसारखे दोन महत्त्वाचे हरितवायू हवेत सोडतात. शेती आणि तापमानवाढ हे एकमेकांशी निगडित आहेत का? याचे उत्तर ‘होय’ असे असून यावर बरेच संशोधन झाले आहे. लोक त्यापासून अजून अनभिज्ञ आहेत. भातशेतीमधील दलदलीमुळे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे ग्रॅस बाहेर पडतात. मानवामुळे तयार होणार्‍या मिथेन गॅसपैकी ११ टक्के मिथेन हा पृथ्वीवर होणार्‍या भातशेतीतून तयार होतो. भाताच्या शेतात साचणार्‍या पाण्यातील दलदलीतून मिथेनचे बुडबुडे तयार होतात. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळा असेल, तर भातशेती आणि इतर शेतीतून तयार होणार्‍या मिथेनचे व नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण अधिक असते. भातशेतीतून तयार होणार्‍या मिथेनसोबत जिथे जमीन सातत्याने ओलिताखाली आहे, तिथेही मिथेन शेतीतून हवेत मिसळला जातो. याव्यतिरिक्त जे नैसर्गिक दलदलीचे प्रदेश आहेत, जसे नदी जिथे समुद्राला मिळते तो त्रिभुज प्रदेश असेल, अमेझॉनसारख्या नद्यांमुळे तयार होणारी दलदलीचे भाग असतील, ज्वालामुखीजवळचे भाग असतील यांतून मिथेनचे नैसर्गिक उत्सर्जन सतत चालू असते. मात्र, त्यापेक्षाही जास्त मिथेन हा शेती आणि त्याच्ङ्माशी निगडित गोष्टींनी तयार होतो.
 
 
एका अभ्यासानुसार २०११ नंतर शेतीतील पाला जाळून होणार्‍या हरितवायूंचे उत्सर्जन ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेले आहे. शेतीमध्ये गहू, ज्वारी इत्यादी पिकांचे शेष भाग किंवा उसतोडीनंतरचे उसाचे पाचट जेव्हा जळतात, तेव्हादेखील कार्बन डायऑक्सईड आणि कार्बन मोनोक्साइड तयार होतो. कुजण्याच्या प्रक्रियेमधून मिथेन तयार होतो. सगळ्या उत्सर्जनाचा वेग आणि प्रमाण इतके आहे की, पृथ्वी त्याचा निकाल लावेपर्यंत नवीन वायू वातावरणामध्ये भर घालतात.
मिथेनचे उत्सर्जन जिथे पशुपालन आहे अशाही ठिकाणी सगळ्यात जास्त होते. रवंथ करणारी जनावरे त्यांच्या नैसर्गिक नियमांनी होणार्‍या पचनक्रियेतून तोंडाद्वारे मिथेन हवेत सोडतात. शेणातून खत होताना किंवा शेणखत शेतामध्ये गेल्यानंतर यातूनदेखील नैसर्गिकरित्या मिथेन बाहेर पडतो. पेनिसिलव्हिनिङ्मा विद्यापीठात मिथेन कमी तयार करणार्‍या आणि रवंथन करणार्‍या प्राण्यांवर संशोधन चालू आहे. इतर काही ठिकाणीही ते चालू आहे. कदाचित येत्या काही कालावधीत रवंथ न करणारे किंवा रवंथ कमी करणारे, ढेकर न काढणारे गाय, म्हैस, बैल बघायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको.
 
दुसरा महत्त्वाचा हरितवायू शेतीतून बाहेर पडतो, तो म्हणजे नायट्रस ऑक्साईड. तसे या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात. कारण तो हुंगला किंवा त्याचा वास घेतला, तर ’न्युरल स्टिम्युलेशन’ होऊन माणूस हसायला लागतो. शेतीत वापरला जाणारा युरिया आणि नत्रयुक्त खतातील नत्र हा या वायूच्या उत्सर्जनाचा मुख्य स्रोत आहे. जमिनीमध्ये गेल्यानंतर जमिनीतले नत्राचे विघटन करणारे जिवाणू याचे विघटन करायला चालू करतात. युरिया हा सगळ्याच झाडांकडून वापरला जात नाही. युरिया ५० टक्केच फक्त उपयोगात आणला जातो. युरियाचा रेसिड्यू चटकन तयार होत असल्यामुळे उरलेला युरिया मातीमध्ये तसाच राहतो. एकतर पावसाच्या पाण्यासोबत नदीला हे नत्र मिळते किंवा हवेत नायट्रस ऑक्साईड रुपाने मिसळते.
 
खतांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण हा यातील वेगळाच भाग आहे. परंतु, याच रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड तयार होऊन हवेत मिसळतो, हे मात्र सिद्ध आहे. शेतीला जेवढा जास्त पाणीपुरवठा आणि मातीची भीज जेवढी काळ जास्त, तेवढा वेळ जिवाणू कार्याने नायट्रस ऑक्साईड तयार होत राहतो. दुर्दैवाने नायट्रोसॉक्साईड हा इतर हरितगृह वायूपेक्षा जास्त दिवस हवेत राहतो. इतर हरितगृह वायूंपेक्षा कितीतरी पट अधिक ताकदीचा असतो. याच वायूमुळे सूर्याचे अतिनील किरण मूळ तीव्रतेपेक्षा अधिक तीव्र होतात. त्यामुळे नायट्रस ऑक्साईड हा तापमान वाढवणारा प्रमुख खलनायक ठरत आहे. मिथेन हा वायूसुद्धा अवरक्त किरण शोषून घेतो.
 
मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन हे थेट शेती व जनावरांचे खाद्य यांच्याशी जोडले गेलेले असल्याने चीनचा प्रथम, तर भारताचा याबाबत द्वितीय क्रमांक लागतो. दोन्ही देश हे शेतीप्रधान देश आहेत. मिथेन तर वातावरणात स्वतःच कार्बन डायऑक्साईड आणि वाफेमध्ये रूपांतरित होतो. वाढणारी ही वाफदेखील तापमानामध्ये आणखीच भर घालत आहे. पाण्याची वाफ ही पृथ्वीचे तापमान कसे वाढवते, याबद्दल लेखाच्या उत्तरार्धात वाचूया. 
(क्रमशः)

- राहुल पाटील
(लेखक पर्यावरण आणि वनस्पती अभ्यासक आहेत.)