विकसित भारताच्या दिशेने मोठं पाऊल! मोदींच्या हस्ते कर्मयोगी सप्ताहाचे उद्घाटन
20-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या अंर्तगत पंतप्रधानांनी मिशन कर्मयोगीच्या यशावर भाष्य केले आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी अभिनव विचार आणि नागरिक केंद्रीत दृष्टीकोन अवलंबण्याची गरज असल्याचे म्हटले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्माण करणे हे आपले ध्येय आहे, जे आपल्या देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनेल. या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की जर आपण याच उत्कटतेने काम करत राहिलो तर देशाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहादरम्यान शिकलेल्या नवीन गोष्टी आणि अनुभव हे आपल्या लोकांना बळ देतील आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतील, ज्यामुळे २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यात आपल्याला मदत होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांत सरकारची मानसिकता बदलण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा केली, ज्याचा प्रभाव आज लोकांना जाणवत आहे. ते म्हणाले की सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आणि मिशन कर्मयोगीसारख्या उपक्रमांच्या प्रभावामुळे हे शक्य झाले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ऍस्पिरेशनल इंडिया
जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संधी म्हणून पाहत असले तरी भारतासाठी मात्र, आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होत आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. मोदींनी दोन 'एआय'चा उल्लेख केला - एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि दुसरे ऍस्पिरेशनल इंडिया. दोन्हींमध्ये समतोल साधने आवश्यक असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. भारताच्या प्रगतीसाठी जर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वीपणे वापर केला तर त्यामुळे परिवर्तनात्मक बदल घडू शकेल असे सुद्धा मोदी म्हणाले.
मिशन कर्मयोगी सप्टेंबर २०२० मध्ये सुरु करण्यात आले. जागतिक दृष्टीकोनासह भारतीय नीतिमूल्यांमध्ये रुजलेल्या आणि भविष्यातील आव्हानांना सज्ज असलेली नागरी सेवा निर्माण व्हावी ही यामागची कल्पना होती. राष्ट्रीय शिक्षण सप्ताह, नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता विकासासाठी नवी प्रेरणा देईल असे मत व्यक्त केले जात आहे.