स्फोटाने हादरली दिल्ली! सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल

    20-Oct-2024
Total Views |
 
new delhi

नवी दिल्ली: (Delhi Blast)
नवी दिल्लीच्या रोहिणी भागात २० ऑक्टोबरच्या सकाळी सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. सुरक्षा दलांनी घटनास्थाळी धाव घेतली असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत विहारच्या परिसरातील शाळेजवळ धुराचे लोट दिसून आले आणि स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. स्फोटामुळे परिसरातील वाहनांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या भिंतीजवळ पांढऱ्या पावडरसारखा पदार्थ आढळून आला असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. या रहस्यमय स्फोटामागे काही दहशतवादी संबंध आहेत का हे तपासण्यासाठी एनआयए अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले असून, स्फोट कसा झाला हे शोधण्यासाठी  पदार्थांचे नमुने गोळा करत आहे. या घटनेनंतर सामाजमाध्यमांवर स्फोटाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने माध्यमांना माहिती देताना म्हटले हा सिलेंडरचा स्फोट तरी असू शकतो किंवा एखादी इमारत तरी कोसळलेली असू शकतो एवढा मोठा आवाज झाला. धुराचे लोट आकाशी पसरले असून इथल्या दुकानांच्या काचा फुटल्या असून, होर्डिंग उखडले गेले आहेत.

स्फोटक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनाक्रम निश्चित करण्यासाठी आणि स्फोटाचे कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहेत.