“ही पोकळी कधीही…”, अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचे सोनिया परचुरेंना भावनिक पत्र

    19-Oct-2024
Total Views |

atul parchure
 
 
मुंबई : ( Atul Parchure ) मराठी आणि हिंदी चित्रपट तथा नाट्यसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचे दि.१४ ॲाक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ५७व्या वर्षी अनपेक्षितपणे अतुल यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. केवळ कलाकारांनीच नव्हे तर, अनेक राजकीय मंडळींनी देखील दुःख व्यक्त केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवत अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचे सांत्वन केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे की, “अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. ते सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते होते. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमूल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही. त्यांचं विनोदाचं टायमिंगही कमाल होतं. त्यांच्या कामामुळे ते कायमच आपल्या स्मरणात राहतील.”
 
पुढे लिहिलं आहे की, “अतुल परचुरे यांचं कार्य आणि विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहील. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि आठवणी हा कुटुंबासाठी आधार आहे. त्यांनादेखील कुटुंबाची, मित्रांची आणि चाहत्यांची आठवण येत असेल. पण ते कायम आपल्या हृदयात असतील. शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांनी शक्ती देवो”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.
 
अतुल परचुरे यांनी आजवर ‘व्यक्ती आणि वल्ली’,‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘बे दुणे पाच’, ‘गेला माधव कुणीकडे’ यांसारख्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. तसेच, हिंदीतील त्यांच्या ‘यम है हम’, ‘बडी दूर से आये है’ अशा मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या. त्यांची ‘आर के लक्ष्मण की दुनिया’ ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. शिवाय फिर भी दिल है हिंदुस्तानी, क्या दिल ने कहा, स्टाईल, क्योंकी, गोलमाल, बिल्लू बार्बर या चित्रपटांतही त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारली होती.