अंबरनाथ : ( Ambarnath ) विधानसभा निवडणुकिसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदाराची मतदान केंद्रात गैरसोय होऊ नये यासाठी लक्ष दिले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून या विधानसभेत तीन लाख ७६ हजार ५०६ मतदारांची नोंद झाली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १७ हजार ९५२ मतदारांची संख्या वाढली आहे. एकूण ३३९ मतदान केंद्र असणार आहेत. वयाची ८५ वर्षे पुढील मतदारांसाठी व ज्यांना मतदानासाठी केंद्रावर येणे शक्य नाही त्यांच्यासाठी होम व्होटिंग चा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुढील महिन्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २४०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ३३९ मतदान केंद्र असून अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २२८ मतदान केंद्र तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १११ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या ३१९ इतकी होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत २० मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांना कोणताही त्रास न होता आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदार संघात तीन लाख ७१ हजार ५०६ मतदार असून त्यात एक लाख ९७ हजार ९११पुरुष मतदार व १ लाख ७३ हजार ५३६ महिला मतदारांचा समावेश आहे. तर १०९७ दिव्यांग मतदार, ८५ वर्षे वरील २९३१ मतदार तसेच ५९ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे. आचारसंहिता लागू असल्याने नऊ भरारी पथक तैनात आहेत.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून महिलांसाठी पिंक बूथ तयार करण्यात येणार आहेत. तसेच नव मतदारांसाठी सेल्फी पाँईंट, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित पुरी यांनी दिली.