मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गॅंगकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज केला आहे. आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव देखील घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा सलमान खानची वाईट अवस्था होईल, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता सलमान खानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला असून आलेल्या मेसेजची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला बऱ्याच वर्षांपासून धमकावले जात आहे. नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेत बाबा सिद्दिकी यांचे सलमान खानशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये ५ कोटींच्या खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, ही धमकी गांभीर्याने घेण्यासही बजावलं आहे. त्यात लिहिलं आहे की, “हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारं वैर त्याला संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटींची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल”, असं या मेसेजमध्ये लिहिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगीतले.
लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यातील वैर १९९८ पासूनचं आहे. १९९८ साली सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळवीटांना पवित्र मानलं जातं, मात्र, त्यांच्या शिकारीमुळे समाजात असंतोष पसरल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. यामुळेच तेव्हापासून बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. शिवाय एप्रिल महिन्यात सलमानच्या बांद्रातील गॅलेक्सी घरावर दोन अज्ञातांनी गोळीबार करून पळ काढला होता. आता पुन्हा एकदा बाबा सिद्दिकींची हत्या व सलमान खानला धमकी यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली आहे.