मुंबई : ( Pravin Darekar )“सगळ्या आंदोलनातून मनोज जरांगे भरकटल्यासारखे वाटत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल, असे वाटले होते. परंतु, मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसत आहेत. हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे,” असे आव्हान भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी दिले.
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे, फायद्याचे बोला. इम्तियाज जलीलसोबत तुम्ही बैठका घेत आहात, ते छत्रपतींच्या मावळ्यांना आवडेल का? भाजपच्या उमेदवारांना टार्गेट करण्याचे नियोजन न समजण्याइतका महाराष्ट्र दूधखुळा राहिलेला नाही. जरांगे पाटील यांच्यात धमक असेल, तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावे. परंतु, आपला कुणीतरी वापर करतोय, खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी राजकीय पोळी भाजतेय, त्याला जरांगे बळी पडत आहेत, हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे.”
फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा सरकारशी बोला
दरेकर पुढे म्हणाले की, “फडणवीसांच्या नावाची कावीळ जरांगेंना नव्हती. कुणाच्या तरी सांगण्यावरुन ती झालेली दिसतेय, ती निवडणुकीत बाहेर येईलच. फडणवीसांना टार्गेट करण्यापेक्षा सरकारशी बोलले पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही एकट्यालाच का टार्गेट करता? ज्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, सुप्रीम कोर्टात फेटाळले गेले नाही, ‘अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळा’तून एक लाख बेरोजगारांना साहाय्य करून उद्योगधंद्यात उभे केले, मराठा समाजाला जी मदत केली ती तरुण-तरुणींना माहित आहे. हा सगळा लेखाजोखा पाहिला, तर फडणवीस खर्या अर्थाने एक तारणहार म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्यांनाच तुम्ही टार्गेट करत आहात. तुमची राजकीय खेळी जनतेच्या लक्षात आली आहे,” असा टोलाही दरेकरांनी जरांगेंना लगावला.