हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा सैनीच

    16-Oct-2024
Total Views |

Nayab Singh Saini
 
नवी दिल्ली : ( Nayab Singh Saini )हरियाणामध्ये भाजपने खांदेपालट केला नसून नायबसिंह सैनी हेच नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पंचकुला येथील भाजप कार्यालयात झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
 
भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. सैनी यांचे नाव अनिल विज आणि कृष्णा बेदी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रस्तावित केले, त्यास सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. बैठकीनंतर सैनी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. सैनी हे गुरुवारी दि. १७ ऑक्टोबरला पंचकुलामध्ये शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सैनी यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने हरियाणात लोककल्याण आणि सुशासनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री म्हणून नायबसिंह सैनी त्यास आणखी गती देतील. शेतकरी, महिला, तरुण आणि गरीब यांच्या सक्षमीकरणासोबतच हरियाणाला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्याचे काम भाजप सरकार सुरूच ठेवणार आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.