देणारा कोण आणि फसवणारा कोण? जरांगेंनी विचार करावा! मुख्यमंत्री शिंदेंचं विधान
16-Oct-2024
Total Views | 30
मुंबई : मराठा समाजाला देणारा कोण आणि फसवणारा कोण? याबद्दल मनोज जरांगेंनी विचार करायला हवा, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही जे बोलतो ते करतो. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, असं भर दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन मी सांगितलं. त्यानंतर तात्काळ अधिवेशन बोलवलं आणि मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. ते आरक्षण रद्द करायला कोण गेलं हे जरा बघा. यापूर्वी देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं. ते महाविकास आघाडीने घालवलं. आता आम्ही दिलेलं आरक्षण रद्द करण्यासाठीसुद्धा आटापिटा सुरु आहे. न्यायमुर्ती शिंदे समिती गठित केल्यामुळे मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. ज्यांच्या हातात इतके वर्ष सत्ता होती त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. फक्त मतांसाठी त्यांचा वापर केला," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण महायूतीने मराठा समाजाला काय काय दिलं, हा विचार जरांगेंनी करायला हवा. ज्यांनी काहीच न करता मराठा समाजाला वंचित ठेवलं त्यांच्याबद्दल जरांगेंनी निवडणूकीत विचार केला पाहिजे. देणारं कोण आणि फसवणारं कोण हे त्यांनी बघितलं पाहिजे," असेही ते म्हणाले.