मुंबई : "बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या ही अतिशय वाईट गोष्ट असून, ज्यांनी हे कृत्य केले ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. मात्र विरोधकांनी यावर राजकारण करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे." असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री सय्यद शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांची आपला मुलगा झीशान सिद्दीकी याच्या ऑफीस बाहेर असताना, काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करत हत्या केली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सोशल मीडीयावर माहिती शेअर करत बिश्नोई गँगच्या माणसांनी या बद्दल खुलासा केला आहे. भाजप मंत्री सय्यद शाहनवाज हुसेन माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले "बाबा सिद्दीकी ही व्यक्ती खूप चांगली होती. त्यांच्या मृत्यूने आम्हा सगळ्यांना दु:ख झाले आहे. या गुन्ह्यामागच्या दोन सुत्रधारांना अटक करण्यात आली असून, पोलिस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत, त्यामुळे यात सामील असलेल्या लोकांना शिक्षा होईल. या घटनेमुळे सगळ्यांनाच दु:ख झाले आहे. परंतु काँग्रेस आणि उबाठा गटाच्या लोकांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. अशा घटनेवर राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील विरोधकांना खडे बोल सुनावले आहे. नक्वी म्हणाले "इतक्या गंभीर घटनेवर असंवेदनशील प्रतिक्रीया देणे विरोधकांना शोभत नाही.सिद्दीकी यांचा खून ही अतिशय गंभीर बाब आहे. या मागच्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल."