हरियाणात १७ तर जम्मू – काश्मीरमध्ये १६ ऑक्टोबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी
12-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : (Oath-taking Ceremony) हरियाणाच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी दसरा मैदान, पंचकुलामध्ये सकाळी १० वाजता आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
शपथविधी सोहळ्याला राज्यातील जनतेस आमंत्रित केले जाणार आहे. भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या तयारीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी १० सदस्यांची समिती स्थापन केली आहे. नायबसिंह सैनी यांचे पुन्हा मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित मानले जात असून त्यांच्यासोबत १० ते ११ मंत्रीही शपथ घेऊ शकतात.
जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन होणार आहे. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ओमर अब्दुल्ला १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रिपदासाठी नामनिर्देशित ओमर अब्दुल्ला यांनी राजभवनात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. सिन्हा यांच्या भेटीदरम्यान, अब्दुल्ला यांनी युतीच्या भागीदारांच्या वतीने समर्थनाची पत्रे सादर केली.