टाटा ट्रस्टची जबाबदारी नोएल टाटांकडे; संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय

    12-Oct-2024
Total Views |
 
noal tata
 
 
 मुंबई : रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. उद्यमशीलता आणि या नैतिकता यांचा संगम घडवून आणत, रतन टाटा यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नवीन अध्याय रचले आहेत. त्यांचा हाच वारसा आता त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा पुढे चालवणार आहेत. रतन टाटा ३,८०० कोटी रुपयांची संपत्ती आपल्या पश्चात सोडून गेले आहेत. त्याच बरोबरीने रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे.

टाटा समुहाने एकमताने नोएल टाटा यांची टाटा समुहाच्या अध्यक्षपदी निवड केली असल्याची माहिती टाटा समूहाने माध्यमांना दिली. नोएल टाटा नियुक्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले "माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीबद्दल सर्वांचे आभार. टाटा समुहाच्या संस्थापकांचा, रतन टाटा यांचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी मी कटीबद्ध आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण विकासकामांची पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करुया."

कोण आहेत नोएल टाटा?
रतन टाटा यांचे उत्तराधिकारी आणि टाटा समुहाचे नवे अध्यक्ष नोएल टाटा, रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. रतन टाटांचे वडील नवल टाटा यांनी दोन लग्नं केली. नवल टाटांचं पहिलं लग्न सूनी कमिश्रिएट यांच्याशी झाले होते. सूनी व नवल या दाम्पत्याला दोन मुलं झाली ती म्हणचे रतन व जिमी. जिमी टाटा यांचा टाटा समुहामध्ये वाटा असला तरी त्यांना व्यवसाय सांभाळण्यात रुची नाही. नवल यांनी १९५५ मध्ये स्वित्झर्लंडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरं लग्न केलं. या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा. या पूर्वी नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते.त्याच सोबत, सलग ११ वर्ष ते ट्रेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. ते ट्रेंटचे उपाध्यक्ष असताना ट्रेंटचे केवळ एक दुकान होते. संचालक म्हणून त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी त्यानंतर त्यांनी ट्रेंटची ७०० दुकानं उभी केली. नोएल टाटा यांचे लग्न आलू मिस्त्री यांच्याशी झाले आहे. आलू मिस्त्री या ज्येष्ठ उद्योजक पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आहेत. त्याच बरोबर दिवंगत उद्योजक सायरस मिस्त्री त्यांचे बंधु आहेत.